- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत वेगाने होत असलेली घट, लसीकरणाने घेतलेला वेग आणि जुलै महिन्यात संसदेच्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची पुनर्रचना आणि भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासाठी सरकार आणि संघ परिवारातील अतिउच्च पातळीवर विचारविनिमय सुरू आहे.
नेतृत्वाला सध्या तीन महत्वाच्या विषयांवर निर्णय घ्यायचा आहे. तीन विद्यमान आमदार सर्बानंद सोनोवाल (आसाम), त्रिवेंद्र सिंह रावत (उत्तराखंड) आणि मुकुल रॉय (पश्चिम बंगाल) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात आणण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री होते. ते विद्यमान आमदार असूनही त्यांना मुख्यमंत्रिपद नाकारले गेले. रावत यांना राज्यात विधानसभा निवडणूक जवळ आली असताना ८ महिने आधी मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यात आले. तर पश्चिम बंगालमध्ये भाजप बळकट करण्यात मुकुल राॅय यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात जागा देण्याचा विचार सुरु आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणावे की नाही यावरही चर्चाही झाली आहे. जनता दल (यु) मोदी मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही तसेच मंत्रिमंडळाचा भाग होता त्या लोकजनशक्ती पक्षाबद्दल निर्णय भाजपला घ्यायचा आहे. पंजाबमध्ये भाजपपासून वेगळा झालेल्या अकाली दलाबद्दलही धोरण ठरवावे लागणार आहे.
याशिवाय बिहारच्या उप मुख्यमंत्री पदावरून दूर करून राज्यसभेत आणलेले सुशील मोदी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना काही पद दिले जाणार की नाही याबाबतही निर्णय घ्यावा लागेल. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून तेथे पक्ष बळकट करण्यासाठी सरकारमध्ये वरूण गांधी यांना सामावून घेण्याचा प्रस्तावही आहे.
डॉ. देवी शेट्टींना मिळणार संधी? कोरोना महामारीविरोधातील मोहिमेत साह्य करण्यासाठी बाहेरून आरोग्य विषयातील तज्ज्ञाला मंत्रिमंडळात आणण्याचा विचार सरकार करू शकते, अशा चर्चा आहेत. खासगी रुग्णालयांची साखळी चालवणारे डॉ. देवी शेट्टी यांचे नाव यासाठी चर्चेत आहे. हरदीप सिंग पुरी (गृह निर्माण आणि नागरी उड्डयन), एस. जयशंकर (परराष्ट्र व्यवहार) आणि आर. के. सिंह (उर्जा) यांच्याप्रमाणेच शेट्टी यांना बाहेरून सामावून घेतले जाऊ शकते.