नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा हा तब्बल 1,76,36,307 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,23,144 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 2771 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,97,894 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोना रुग्णांची भेट घेण्यासाठी गेलेल्या एका केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या नातेवाईकांना अजब सल्ला दिला आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांनी कोरोना काळात एक अजब विधान केलं आहे. "बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल" असं म्हटलं आहे. शेखावत यांनी जोधपूर येथील एका रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान एका कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना "बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल" असा सल्ला दिला आहे. यावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे. शेखावत यांनी राजस्थानमधील काही रुग्णालयांची पाहणी करण्यासाठी दौरे केले. याच दरम्यान जोधपूरमधील परिस्थिती चिंताजनक असल्याने येथील रुग्णालयांना भेट दिली.
रुग्णालयामध्ये शेखावत यांनी काही रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यावेळी दोन महिला प्रचंड रडत होत्या. त्यांनी यापुढे आमचं कसं होणार असा प्रश्न शेखावत यांना विचारला. त्यावर शेखावत यांनी देवावर विश्वास ठेवा तो सर्वकाही ठिक करेल, असं सांगितलं. तसेच "बालाजी महाराजाचं नामस्मरण करा, त्यांना नारळ वाहा सर्व काही ठीक होईल" असं शेखावत यांनी या मदत मागणाऱ्या महिलांना सांगितलं. या घटनेनंतर शेखावत यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. "डॉक्टर त्याचं काम करत आहेत. बालाजीवर श्रद्धा ठेवा आणि नारळ वाहा" असा सल्ला देण्यात काय चुकीचं आहे, असा प्रश्न शेखावत यांनी विचारला आहे.
गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपण केलेलं वक्तव्य योग्यच असून रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना मानसिक आधार देणे हे चुकीचं आहे का? असं म्हटलं आहे. तसेच घाबरलेल्या रुग्णाच्या आईच्या मनाला शांती मिळावी म्हणून तिला आधार देणं. तसेच औषधांबरोबर प्रार्थनाही कामी येतील हे सांगायचं काम मी केलं. डॉक्टरांकडून मिळणाऱ्या उपचारांसंदर्भात मला काहीही शंका नसून ते त्यांची जबाबदारी अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडत आहेत असंही शेखावत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.