हवामान अंदाजांतील अचूकता वाढविण्याचे प्रयत्न, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची लोकसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:38 AM2018-07-19T03:38:14+5:302018-07-19T03:38:27+5:30
हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.
नवी दिल्ली : हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासात ते म्हणाले, यंदा देशात सामान्य प्रमाणात, म्हणजेच ९६ ते १0४ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याने २००७ सालापासून नवी सांख्यिकीय हवामान अंदाजविषयक प्रणाली वापरात आणली आहे. त्यामुळे नंतरच्या काळात हवामानविषयक अंदाज चुकण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. हवामानशास्त्र खात्याने २०१४ व २०१५मध्ये कमी पावसासंदर्भात वर्तविलेले अंदाज अचूक ठरले होते. हवामान खात्याला अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भारतीय व विदेशी शैक्षणिक संस्थांची मदत घेऊन हवामान खाते आपली यंत्रणा सुधारण्याचा व अधिक अचूक अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
>मिशन मान्सून
केंद्र सरकारने मिशन मान्सून या योजनेद्वारे दूरच्या काळातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे पावसाची निश्चित व काही काळाने पडण्याची शक्यता याविषयी माहिती देणे सोपे होईल, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद केले.