ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - राजकीय नेत्यांमधील व्हीआयपी संस्कृतीचा फटका आता एअर इंडियातून प्रवास करणा-या प्रवाशांना बसू लागला आहे. केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजीजू यांच्यामुळे लेहवरुन दिल्लीला येणा-या विमानाचे उड्डाण रखडले आणि मंत्रीमहाशयांना जागा मिळावी यांच्यासाठी तिघा प्रवाशांनाही विमानातून उतरवण्यात आल्याचा आरोप होत आहे.
२४ जून रोजी केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजीजू हे जम्मू काश्मीरमधील लेहवरुन दिल्लीला परतत होते. रिजीजूंचे खासगी सचिव व जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह हेदेखील रिजीजूंसोबत होते. या तिघांमुळे एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण विलंबाने झाले. तर या तिघांना जागा मिळावी यासाठी अन्य तिघा प्रवाशांना विमानातून उतरवल्याचा आरोप केला जात आहे. सकाळी ११.४० वाजता विमानाचे उड्डाण होणार होते, मात्र तांत्रिक कारणामुळे विमानाचे उड्डाण विलंबाने झाल्याचे रिजीजू यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे एअर इंडियाचे न्यूयॉर्क येथे जाणा-या विमानाला तब्बल दीड तास विलंब झाला होता. त्यामुळे व्हिआयपी नेत्यांच्या या थाटामुळे भाजपावर पुन्हा एकदा टीका सुरु झाली आहे.