प्लाझ्मा थेरपी न वापरण्याचा अमेरिकेने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:38 AM2020-08-22T06:38:21+5:302020-08-22T06:38:41+5:30
प्लाझ्माथेरपी किती उपयोगी ठरू शकते याबद्दल इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने एक पाहणी केली होती. मात्र, त्याचे निष्कर्ष अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत.
नवी दिल्ली : कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी प्लाझ्माथेरपी फारशी प्रभावी ठरत नसल्याचे आढळल्यामुळे अमेरिकेने या उपचार पद्धतीचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचारांत प्लाझ्मा थेरपीला महत्त्व देणाऱ्या भारतासारख्या देशांची मोठी अडचण झाली आहे.
प्लाझ्माथेरपीमुळे कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी खूप फायदा होतो हे अद्याप मानवी चाचण्यांतून सिद्ध झालेले नाही. त्यामुळेही अमेरिकेने ही उपचार पद्धती कोरोना रुग्णांसाठी यापुढे वापरायची नाही, असे ठरविले आहे. भारतामध्ये कोरोनाची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी प्लाझ्माथेरपी खूप महत्त्वाची मानली गेल्याने महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा या तीन राज्यांनी प्लाझ्मा बँकादेखील सुरू केल्या आहेत.
प्लाझ्माथेरपी किती उपयोगी ठरू शकते याबद्दल इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने एक पाहणी केली होती. मात्र, त्याचे निष्कर्ष अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत.
यासंदर्भात एका संसर्गजन्य रोगतज्ज्ञाने सांगितले की, प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांवर उपचार करताना प्रभावी ठरत नसेल तर आयसीएमआरने तसे जाहीर करावे व ही उपचार पद्धती कोरोना रुग्णांसाठी न वापरण्याचा निर्णय घ्यावा. या थेरपीच्या उपयोगितेबद्दल आयसीएमआरने एप्रिलमध्ये चाचण्यांना प्रारंभ केला. त्याद्वारे ४५० कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले.
या प्रयोगालाही आता तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. आयसीएमआरने या चाचण्यांचे निष्कर्ष आता तरी जाहीर करावेत, अशी मागणी संसर्गजन्य रोगतज्ज्ञ करीत आहेत.
>खासगी रुग्णालयांनी घेतला गैरफायदा
प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ठरते की नाही याबद्दल संदिग्धता असल्याचा फायदा खासगी
रुग्णालयांनी घेतला आहे.कोरोना रुग्णांना प्लाझ्माथेरपी हा रामबाण उपाय असल्याचे भासवत त्या उपचारांपोटी रुग्णांकडून खासगी रुग्णालये वारेमाप पैसे उकळत असल्याच्या घटना घडत आहेत.त्याला आयसीएमआर, केंद्र सरकारने पायबंद घालावा, अशी मागणी काही संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी केली आहे.