नवी दिल्ली : देशात ‘लॉकडाऊन’ लागू असताना लोक नियमांचे जेवढ्या प्रामाणिकपणे पालन करीत होते तेवढे ते आता करताना दिसत नाहीत. देशात आता ‘अनलॉक-२’चा टप्पा सुरू असताना लोक वाढत्या बेफिकिरीने वागताना दिसतात. खरे तर जेव्हा अधिक सावध राहायला हवे तेव्हा अशी बेफिकिरी ही गंभीर चिंतेची बाब आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांना फटकारले.
टीव्हीवरून केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी केलेले नियम व लागू केलेले निर्बंध हे देशातील १३० कोटी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हाती घेतलेले अभियान आहे. त्यामुळे गावाचा सरपंच असो वा देशाचा पंतप्रधान, सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे व वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे अशा नियमांचे कसोशीने करावेच लागेल.भारतातील परिस्थिती आटोक्यात
- जे नियमांचे पालन करीत नाहीत त्यांना आपल्याला सांगावे लागेल, थांबवावे लागेल व समजावून सांगावे लागेल, असे सांगून मोदींनी विदेशात एका देशाच्या पंतप्रधानाला मास्क वापरला नाही म्हणून १३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा दाखला दिला.
- नियमांची प्रत्यक्ष जागेवर अंमलबजावणी करणाऱ्या स्थानिक प्रशासनांनीही अशीच तत्परता दाखवायला हवी, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
- कोरोनाविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यात असताना बेपर्वाई व शिथिलता दाखविणे मारक ठरेल, असा इशारा देत मोदी म्हणाले की, कोरोनाच्या मृत्यूंचे प्रमाण पाहिले तर इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती बरीच आटोक्यात असल्याचे दिसते.
- योग्यवेळी ‘लॉकडाऊन’ लागू केल्याने व लोकांनी त्याचे काटेकोर पालन केल्यानेच हे शक्य झाले; पण आता ‘अनलॉक’च्या काळात जेव्हा पूर्वीपेक्षा अधिक सावध राहण्याची गरज आहे तेव्हा व्यक्तिगत तसेच सामुदायिक पातळीवरही बेफिकिरी वाढतच असल्याचे दिसते.