…तोपर्यंत लोक असेच होरपळून मरतील: सुप्रीम कोर्ट; गुजरात सरकारला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 07:26 AM2021-07-20T07:26:26+5:302021-07-20T07:28:05+5:30
कोरोना रुग्णालयांतील अग्निसुरक्षेच्या निकषांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशावर कुरघोडी करण्यासाठी गुजरात सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : कोरोना रुग्णालयांतील अग्निसुरक्षेच्या निकषांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशावर कुरघोडी करण्यासाठी गुजरात सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. या अधिसूचनेमुळे अग्निसुरक्षा नसलेल्या रुग्णालयांना आणखी वेळ मिळेल. त्यांनी कृती करेपर्यंत मात्र लोक असेच होरपळून मरण्याची शक्यता आहे, अशा शब्दांत न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे की, एकदा आम्ही एखादा आदेश दिला की, त्याच्यावर अधिसूचना जारी करून कोणालाही कुरघोडी करता येणार नाही. गुजरात सरकारने मात्र रुग्णालयांना संपूर्ण मोकळीकच देऊन टाकली. अग्निसुरक्षेच्या निकषांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे २०२२ पर्यंत पालन केले नाही, तरी चालेल, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात योग्य अग्निसुरक्षा यंत्रणा बसेपर्यंत लोक होरपळून मरण्याच्या घटना घडतच राहतील.