“विनायक दामोदर सावरक यांच्यासारख्या क्रांतिकारक, लेखक, तत्त्वज्ञ, कवीचा अपमान करण्यात काँग्रेसनं कोणतीही कसर सोडली नाही,” असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केला. "स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राष्ट्रनायक सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सावरकरांहून मोठे कोणीही नव्हते. स्वातंत्र्यानंतर सावरकरांना जो सन्मान मिळायला हवा होता तो दिला गेला नाही,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले. हिंदुत्व हा शब्द वीर सावरकर यांनीच दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सावरकरांच्या जयंतीनिमित्त उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी प्रकाशित केलेल्या 'वीर सावरकर - जे भारताची फाळणी रोखू शकले असते आणि त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीकोन' या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले. “जर काँग्रेसनं सावरकरांचं म्हणणं ऐकलं तर देशाची फाळणी झाली नसती. पाकिस्तान जाईल येईल पण भारत कायम राहिलअसं सावरकर म्हणाले होते,” असंही त्यांनी नमूद केलं.
“प्रत्येक नागरिकाला अल्पसंख्याक बहुसंख्याकच्या दृष्टीकोनातून पाहण्यापेक्षा त्यांना नागरिकांच्या रुपात पाहिलं पाहेज. आम्ही उत्तर प्रदेशात हे लागू केलं आणि रस्त्यावर ना नमाज पठण होणार ना पूजा होणार हे पाहिलं,” असं योगी म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी सरकारनं पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांची प्रतिमा लावली होती, परंतु नंतर काँग्रेसनं ती हटवल्याचंही त्यांनी सांगितलं.