नवी दिल्ली : खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅपनं अनेक पावलं उचलली आहेत. व्हॉट्स अॅपनं एकच मेसेज पाचवेळा फॉरवर्ड करण्यावर निर्बंध आणले आहेत. यानंतर आता दिल्लीतील एका संस्थेनं खोट्या बातम्यांना आळा घालणाऱ्या अॅपवर काम सुरू केलं आहे. या अॅपच्या मदतीनं बातमी खरी आहे की खोटी, हे वापरकर्त्यांना कळेल. या अॅपच्या मदतीनं व्हॉट्स अॅपवरील बातमीची पडताळणी केली जाईल. दिल्लीतील इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकवणारे असोशिएट प्रोफेसर पोन्नूरंगम कुमारगुरू यांच्या नेतृत्त्वाखालील एक टीम सध्या नव्या अॅपवर काम करत आहे. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून अनेकदा खोट्या बातम्या पसरवल्या जातात. त्यांना आळा घालण्यासाठी सध्या ही टीम अॅप तयार करतेय. व्हॉट्स अॅपवर शेयर होणाऱ्या बातम्यांची तथ्यता पडताळून पाहण्याचं काम हे अॅप करेल. त्यासाठी हे अॅप बातमीचा मुख्य स्रोत पडताळून पाहणार आहे. सध्याच्या स्थितीत हे अॅप अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडेल, असा विश्वास असोशिएट प्रोफेसर पोन्नूरंगम कुमारगुरू यांनी व्यक्त केला. 'अनेकदा व्हॉट्स अॅपवरुन अफव्या पसरवल्या जातात. त्या खऱ्या समजून जमावाकडून हत्या केल्या जातात. अशा परिस्थितीत आम्ही तयार करत असलेलं अॅप महत्त्वाचं ठरेल,' असं कुमारगुरू म्हणाले. 'आम्ही मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करत आहोत. व्हॉट्स अॅपवर फॉरवर्ड होणारे मेसेज 9354325700 नंबरवर पाठवण्याचं आवाहन आम्ही करत आहोत. आम्ही त्या मेसेजची पडताळणी करुन खोट्या मेसेजला आळा घालणारं मॉडेल तयार करु,' असं त्यांनी सांगितलं. मॉडेल कसं काम करणार?एखाद्या व्हॉट्स अॅपवर वापरकर्त्यानं मेसेज 9354325700 क्रमांकावर पाठवल्यास त्याची पडताळणी केली जाईल. तो किती खरा आहे, हे पाहिलं जाईल. अॅपमध्ये हिरवा रंग झाल्यास मेसेज खरा आहे. पिवळा झाल्यास हा मेसेज डिकोड होऊ शकलेला नाही आणि मेसेज आल्यावर अॅपमध्ये लाल रंग दिसल्यास तो मेसेज खोटा असेल.
आता रंग सांगणार व्हॉट्स अॅपवरील मेसेज खरा की खोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:45 PM