वेदनादायक! गंगेचं पाणी खवळले, वाळूत पुरलेले मृतदेह पाण्यावर तरंगले; २४ तासांत ४० अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 10:55 PM2021-06-24T22:55:28+5:302021-06-24T22:57:02+5:30
मागील २ दिवसांपासून स्थानिक पत्रकारांकडून प्रयागराजच्या विविध घाटांवर मोबाईलवर काढलेले व्हिडीओ आणि फोटोत नगरपालिकेचे कर्मचारी मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत
प्रयागराज – मान्सूनच्या आगमनासोबतच उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीनं प्रशासनासमोर नवं आव्हान उभं केले आहे. गंगा नदीच्या किनारी वाळूत दफन केलेल्या मृतदेहांची समस्या वाढली आहे. हे दफन केले मृतदेह कोरोना रुग्णांचा असल्याचं संशय आहे. जसं जसं पाण्याच्या पातळीत वाढ होतेय तसं तसं वाळूत पुरलेले मृतदेह पुन्हा पाण्यावर तरंगताना दिसून येत आहेत.
मागील २ दिवसांपासून स्थानिक पत्रकारांकडून प्रयागराजच्या विविध घाटांवर मोबाईलवर काढलेले व्हिडीओ आणि फोटोत नगरपालिकेचे कर्मचारी मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. बुधवारी काढलेल्या फोटोत एक मृतदेह नदीच्या किनारी आल्याचं दिसतंय. भगव्या रंगाचं वस्त्र असलेल्या या मृतदेहाच्या हातात सफेद रंगाचा सर्जिकल ग्लोव्जपण आहेत. मृतदेह प्रयागराजच्या महापालिका कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.
महापालिकेचे अधिकारी नीरज सिंह म्हणाले की, मागील २४ तासांपासून ४० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आम्ही पूर्ण काळजीनं आणि प्रथेनुसार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहोत. इतकचं नाही तर एका मृतदेहाच्या तोंडात ऑक्सिजन ट्यूब असल्याचं निदर्शनास आलं. हा व्यक्ती मृत्यूपूर्वी आजारी असावा, कुटुंबाने त्याने इथेच सोडून पळ काढला असेल. ते घाबरल्याची शक्यता आहे. सर्व मृतदेहाची विल्हेवाट लागली नाही. काही मृतदेह अलीकडेच दफन केल्याचं दिसतं.
प्रयागराजच्या महापौर अभिलाषा गुप्ता नंदी यादेखील नदीच्या किनारी मृतदेहांवर होत असलेल्या अंत्यसंस्कारात मदत करताना दिसून आल्या. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की, अनेक समुदायांमध्ये मृतदेह दफन करण्याची अनेक वर्षापासून परंपरा आहे. मातीत ज्यारितीने मृतदेह दफन केल्यानंतर त्याची विल्हेवाट लागते तसं वाळूमध्ये होत नाही. आम्हाला जिथे मृतदेह सापडत आहेत. आम्ही तातडीने त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
मागील महिन्यातही उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक नद्यांमध्ये मृतदेह तरंगताना दिसून आले होते. स्थानिक राज्य सरकार लोकांना आवाहन करत होती की, जर कुणाला काही कारणास्तव मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणं जमत नसेल तर याबाबत आम्हाला कळवा, शासकीय व्यवस्थेतून या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तरीही अनेकजण नद्यांमध्ये मृतदेह फेकत असल्याचं समोर आलं होतं.