यूपीएससी लोकसेवा २०२०चा निकाल जाहीर; बिहारचा शुभम कुमार अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 08:12 PM2021-09-24T20:12:06+5:302021-09-24T20:15:47+5:30
तिसऱ्या प्रयत्नात शुभम कुमार देशात पहिला; एकूण ७६१ जण उत्तीर्ण
नवी दिल्ली: यूपीएससीच्या लोकसेवा परीक्षा २०२० चा निकाल जाहीर झाला आहे. एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. बिहारचा शुभम कुमार परीक्षेत पहिला आला आहे. आयआयटी मुंबईमधून त्यानं (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतली आहे. जागृती अवस्थी परीक्षेत दुसरी आली आहे. तिनं MANIT भोपाळमधून बीटेक (इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग) केलं आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण ७६१ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या पहिल्या २५ जणांमध्ये १३ विद्यार्थी आणि १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर एकूण उत्तीर्ण उमेदवारांमधील विद्यार्थ्यांची संख्या ५४५, तर विद्यार्थिनींची संख्या २१६ इतकी आहे.
UPSC declares the final result of Civil Services Examination, 2020. A total of 761 candidates have been recommended for appointment. pic.twitter.com/mSdYt4hWiU
— ANI (@ANI) September 24, 2021
तिसऱ्या प्रयत्नात अव्वल स्थान
देशात पहिला आल्यानं अत्यंत आनंद झाल्याचं शुभम कुमारनं सांगितलं. शुभम बिहारच्या कटिहारचा रहिवासी आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यानं अव्वल क्रमांक मिळवला. याआधी त्यानं २०१८ आणि २०१९ मध्ये त्यानं परीक्षा दिली होती. २०१९ मध्ये तो देशात २९० वा आला होता. २४ वर्षांचा शुभम सध्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसमध्ये प्रशिक्षण घेत आहे. शुभमचे वडील ग्रामीण बँकेत व्यवस्थापक आहेत. त्याच्या कुटुंबात आई, वडील. बहिण, काका, काकींचा समावेश आहे.