IAS टीना डाबी यांच्या बहिणीचे UPSC मध्ये मोठे यश, मिळवला देशातून 15वी येण्याचा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 09:08 PM2021-09-24T21:08:31+5:302021-09-24T21:18:43+5:30
UPSC Final Result 2020: यूपीएससी मध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले, यात बिहारचा शुभम कुमार देशातून पहिला आला आहे.
नवी दिल्ली: आज यूपीएससी परीक्षा 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशभरात एकूण 761 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, बिहारच्या शुभम कुमारने भारतातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर, जागृती अवस्थी आणि अंकिता जैन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या आल्या आहेत. दरम्यान, या परीक्षेत 2015 बॅचच्या IAS टॉपर टीना डाबी यांची छोटी बहीण रिया डाबी यांनीही मोठं यश मिळवलं आहे.
आज यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात 2015 मध्ये यूपीएससीत टॉप आलेल्या IAS टीना डाबी यांची छोटी बहीण रिया डाबी यांचीदेखील निवड झाली आहे. रिया डाबी यांनी या परीक्षेत देशातून 15वा रँक मिळवला आहे. IAS टीना डाबी यांनी आपल्या सोशल मीडियावर बहीणीच्या यशाबद्दल माहिती दिली.
बिहारचा शुभम कुमार देशात पहिला
आज जाहीर झालेल्या यूपीएससी लोकसेवा परीक्षा 2020 मध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले. यात बिहारचा रहिवासी असलेला शुभम कुमार देशातून पहिला आला आहे.आयआयटी मुंबईमधून त्यानं (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतलेल्या शुभमने तिसऱ्या प्रयत्नात अव्वल क्रमांक मिळवला. याआधी त्यानं 2018 आणि 2019 मध्ये परीक्षा दिली होती. 2019 मध्ये तो देशात 290 वा आला होता. 24 वर्षांचा शुभम सध्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसमध्ये प्रशिक्षण घेत आहे.