VIDEO: संतापजनक! दोन महिला पोलिसांची एका वृद्धाला बेदम मारहाण; उर्फी जावेदने उठवला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 10:52 AM2023-01-23T10:52:57+5:302023-01-23T10:53:40+5:30
Bihar Police Video: बिहारमध्ये महिला पोलिसांनी एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात सायकलवरून रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध शिक्षकाला दोन महिलापोलिसांनी काठीने बेदम मारहाण केली आहे. खरं तर हे वृद्ध भाबुआ येथील डीपीएस खासगी शाळेत इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. शाळेतून घरी परतत असताना सायकलवरून ते रस्ता ओलांडत होते, तेव्हा त्यांना दोन महिलापोलिसांनी अडवले, त्यानंतर वृद्ध शिक्षकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जाऊ लागले. यामुळे संतापलेल्या महिला पोलिसांनी त्यांच्यावर लाठ्यांचा वर्षाव सुरू केला.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कैमूर एसपींनी तपासानंतर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी जयप्रकाश चौकात उभारण्यात आलेल्या वाहतूक पोलीस ठाण्यात दोन्ही महिला कॉन्स्टेबल तैनात आहेत. एकीचे नाव जयंती कुमारी आणि दुसऱ्या महिला पोलिसाचे नाव नंदनी कुमारी असून त्या होमगार्ड शिपाई आहेत.
Two women constable in Bihar hitting an elderly becaue he didn’t pick his cycle fast enough after he fell ! @helpline_BP@BJP4Bihar@bihar_police
— Uorfi (@uorfi_) January 22, 2023
Isse kehte hai apni position ka galat ismtemal . pic.twitter.com/e2TAzop6c5
याप्रकरणी मॉडेल उर्फी जावेदने आवाज उठवला आहे. उर्फीने ट्विटच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत बिहार पोलिसांना जाब विचारला आहे. "बिहारमध्ये 2 महिला पोलीस एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करत आहेत. संबंधित व्यक्तीने सायकल रस्त्यातून लवकर बाजूला केली नाही म्हणून ही मारहाण केली गेली. @helpline_BP @BJP4Bihar @bihar_police यालाच म्हणतात आपल्या पदाचा गैरवापर करणे", अशा शब्दांत उर्फीने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
वृद्ध शिक्षकाने सांगितली आपबीती
याप्रकरणी वृद्ध शिक्षक नवलकिशोर पांडे यांनी सांगितले की, "मी डीपीएस स्कूल परमलपूर येथे इंग्रजी विषय शिकवतो. जयप्रकाश चौकातून शाळा संपल्यानंतर 3 वाजता परतत होतो. रस्त्यावर ट्रॅफिक होते, मी सायकल घेऊन रस्ता ओलांडत होतो, तेवढ्यात महिला पोलीस मला काहीतरी बोलल्या पण मी दुर्लक्ष केले आणि पुढे निघालो. यावर एक महिला कॉन्स्टेबल माझ्या सायकलच्या पुढे आली आणि माझी सायकल मागे खेचली अन् मला मारहाण केली. याशिवाय त्यांनी शिवीगाळ देखील केली. त्यांनी मला 20 काठ्या मारल्या. एका व्यक्तीने सोडण्याची विनंती केली असता त्यांनी मला सोडून दिले."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"