नवी दिल्ली: गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील वाढलेला संघर्ष अद्याप शमलेला नाही. लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत दोन्ही देशांमध्ये अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. भारत आणि चीनदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, त्या निष्फळ ठरल्या. यातच चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील गावात बुलेट ट्रेनची सेवा विस्तारली. यानंतर या भागात तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले. यानंतर चीनने स्वायत्त तिबेट क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानच्या वादग्रस्त भागात गाव वसवल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अलीकडेच एक रिपोर्ट दिला असून, यानुसार, चीनने तिबेट स्वायत्त क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश या दरम्यान असलेल्या वादग्रस्त भागावर चीनने १०० घरांचे एक छोटे गाव वसवले असल्याचा दावा केला आहे. या रिपोर्टसंदर्भात भारतीय संरक्षण विभागाने उत्तर दिले आहे.
या बाबतीत आता काही करता येणार नाही
एका भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशचे वरच्या भागात सीमेजवळ असलेल्या सुबनसिरी जिल्ह्यातील वादग्रस्त भागात चीनने १९५९ मध्येच कब्जा केला आहे. या ठिकाणी १०० घरांचे एक गावच वसवले गेले आहे. सुबनसिरी जिल्ह्यातील सदर भाग भारताचा अधिकार असल्याचा दावा आम्ही आधीपासून करत आहोत. मात्र, या भागावर चीनने कब्जा केला आहे. आता यावर काही करता येऊ शकत नाही, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
सदर भागात अचानक काही झालेले नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशमधील सीमान्त भागात १९५९ मध्ये एका ऑपरेशन अंतर्गत आसाम रायफल्सच्या एका चौकीवर हल्ला करून ताबा मिळवला होता. यानंतर या भागात चीनने गाव वसवण्यास सुरुवात केली. या भागात चिनी सैन्याची एक चौकीही आहे. सदर भागात अचानक काही झालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे.
दरम्यान, अमेरिकेने केलेला दावा चीनने फेटाळून लावला आहे. चीनने सॅटेलाइट चित्रे जारी करून त्या भागात काही बांधकाम करण्यात आलेले नाही, हे सांगितले आहे. दुसरीकडे, पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या ३ हजार ४८८ किमी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जियाओकांग मॉडेल सीमा भागातील संरक्षण गावे वसवत आहे.