उत्तर प्रदेश : गप्पांच्या ओघात नर्सनं पाच मिनिटांत एकाच व्यक्तीला दिले कोरोना लसीचे दोन डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 02:35 PM2021-06-11T14:35:20+5:302021-06-11T14:37:50+5:30
Coronavirus Vaccine UP : पाच मिनिटांच्या अंतरानं एकाच व्यक्तीला लसीचे दोन डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर. लसीकरण केंद्रात उडाला एकच गोंधळ. पाहा काय म्हटलंय आरोग्य कर्मचाऱ्यांनी.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु उत्तर प्रदेशातील ललितपुर जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या केंद्रात लसीकरण करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला गप्पांच्या ओघात एका नर्सनं लसीचे दोन डोस पाच मिनिटांच्या अंतरानं दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आरोग्य विभाग आणि लसीकरण केंद्रात एकच गोंधळ उडाला. तर दुसरीकडे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे वृत्त बनावट असल्याचं म्हटलं आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला लसीचे किती डोस आणि किती प्रमाणात द्यायचे हे निश्चित करण्यात आलं आहे. याशिवाय दोन डोसमध्ये किती अंतर असावं हेदेखील ठरवण्यात आलं आहे. लसीकरण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ३० मिनिटे बसावंही लागतं.
घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी घराशेजारी लस देणे शक्य, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
बुधवारी दुपारी शहरातील बडामपुरा येथील कृष्णमुरारी यांनी रावर इंटर कॉलेजमधील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी पोहोचले. त्या ठिकाणी त्यांचं कार्डही तयार करण्यात आलं आणि त्यांना लसीचा डोस देण्यात आला. परंतु यानंतर त्यांनी नर्सनं आपल्याला लसीचे दोन डोस दिल्याचा आरोप केला. आपण जेव्हा लसीकरण केंद्रावर गेलो तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या नर्स एकमेकांशी गप्पा मारत होत्या. त्याचवेळी त्यांनी आपल्याला पाच मिनिटांच्या अंतरानं लसीचे दोन डोस दिल्याचा आरोप संबंधित व्यक्तीनं केला. या प्रकरणाची माहीती मिळताच आरोग्य विभागाच्या पायाखालचीही जमीन सरकली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेण्यात आलं. यानंतर त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. दरम्यान, आता त्यांची प्रकृती ठीक आहे.
डोस कमी सापडले नाहीत
केंद्रावर लाभार्थी आल्यानंतर त्यांना कार्ड देण्यात आलं आणि त्यांचं लसीकरण करण्यात आलं. लाभार्थी तासभर त्याच ठिकाणी थांबले होते. त्यानंतर ते आपल्या घरी गेले. एका तासानंतर ते पुन्हा आले आणि आपल्याला दोन डोस देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर लसीचे डोस तपासण्यात आले. परंतु त्यात कमी डोस सापडले नाहीत, अशी माहिती नोडल अधिकारी, लसीकरण केंद्र के.एस. सिंह यांनी दिली.