उत्तर प्रदेश: मुलायम सिंह यांनी घेतली कोरोना लस; उपमुख्यमंत्री म्हणाले, "अखिलेशजी आता माफी मागा"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 04:07 PM2021-06-07T16:07:15+5:302021-06-07T16:11:54+5:30
Coronavirus Vaccine : मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस. यापूर्वी अखिलेश यादव यांनी लसीला केला होता विरोध.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिह यादव यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. यानंतर मुलायम सिंह यादव यांचा फोटो ट्वीट करत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली.
स्वदेशी लस घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद, असं मुलायम सिंह यादव यांचा फोटो ट्वीट करत केशव प्रसाद मोर्य म्हणाले. "तुमच्याद्वारे लस घेणं ही गोष्ट पक्की करतं की समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याद्वारे लसीबद्दल अफवा पसरवण्यात आली होती. यासाठी अखिलेख यादव यांनी माफी मागितली पाहिजे," असं केशव प्रसाद मौर्य म्हणाले.
सपा संरक्षक व पूर्व मुख्यमंत्री श्री मुलायम सिंह यादव जी स्वदेशी वैक्सीन लगवाने के लिए आपका धन्यवाद।
— Keshav Prasad Maurya (@kpmaurya1) June 7, 2021
आपके द्वारा वैक्सीन लगवाना इस बात का प्रमाण है कि सपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश जी द्वारा वैक्सीन को लेकर अफवाह फैलाई गयी थी। इसके लिएअखिलेश जी को माफ़ी मांगनी चाहिए। pic.twitter.com/GVZHifo9Od
अखिलेश यादव यांनी केला होता विरोध
यापूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर प्रश्न उपस्थित करत विरोध केला होता. "भाजपची लस घेणार नाही," असं अखिलेश यादव म्हणाले होते. "मी भाजपच्या लसीवर कसा भरवसा करू शकतो. जेव्हा आमचं सरकार स्थापन होईल तेव्हा सर्वांना मोफत लस दिली जाईल. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही," असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच सर्वांचं मोफत लसीकरण केलं जावं असं ते म्हणाले होते.