बार गर्लफ्रेंडवर ३ कोटी खर्च करणारा पोलिसांच्या ताब्यात; ATM कार्ड बदलून करायचा फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 07:09 PM2022-11-29T19:09:57+5:302022-11-29T19:11:27+5:30
बार गर्लफ्रेंडवर ३ कोटी खर्च करणाऱ्या नटवरलाल बजरंग बहादूरला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.
नवी दिल्ली : बार गर्लफ्रेंडवर ३ कोटी खर्च करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या नटवरलाल बजरंग बहादूर उर्फ सावन सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून टाटा सफारी आणि अवैध शस्त्र जप्त केली आहेत. पोलिसांना एका व्यक्तीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संशयित सफारीला थांबवायचा प्रयत्न केला, ज्याची नंबर प्लेट तुटलेली होती. तपासणीसाठी पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी भरधाव वेगाने सफारी घेऊन पळू लागला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला कॅन्टोन्मेंटच्या हनुमान गंज तिराहे येथून अटक केली.
दरम्यान, एटीएम बदलून लोकांची फसवणूक करणारा नटवरलाल बजरंग बहादूर असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले. तो मुंबईतून आपली टोळी चालवत होता आणि त्याची टोळी देशभरातील एटीएम बदलून लोकांची फसवणूक करत असे. अटक करण्यात आलेला टोळीचा म्होरक्या बजरंग हा प्रतापगड जिल्ह्यातील जेठवारचा रहिवासी असून तो कानपूर विद्यापीठातून बीए पास आहे.
आरोपीला घातल्या बेड्या
या टोळीने बस्ती येथील अनेक ठिकाणी एटीएम बदलून फसवणूक केली आहे. नटवरलाल हा २६ ऑगस्ट रोजी पाकवालिया पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता. पोलीस अनेक दिवसांपासून या टोळीचा शोध घेत होते, माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या माहितीवरून पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याला अखेर अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत. सीओ शेषमणी उपाध्याय यांनी सांगितले की, या टोळीच्या म्होरक्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"