उत्तर प्रदेशात सपा व बसपाची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 08:36 AM2019-01-06T08:36:39+5:302019-01-06T08:37:24+5:30
सपा ३५, बसपाला ३६ जागा : राहुल व सोनिया गांधींविरुद्ध उमेदवार नसेल
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात समझोता झाला असून, त्यांनी राहुल गांधी यांचा अमेठी व सोनिया गांधी यांचा रायबरेली या मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला राज्यात अन्य एकही जागा न देण्याचा निर्णय घेतला आहे.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शुक्रवारी रात्री बसपाच्या प्रमुख मायावती यांची दिल्लीत भेट घेतली. त्या दोघांत झालेल्या चर्चेमध्ये सपाने ३५ व बसपाने ३६ जागा लढवण्यावर एकमत झाले. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा असून, त्यापैकी दोघे मिळून ७१ जागा लढवतील आणि राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या मतदारसंघांत त्यांचे उमेदवार नसतील. त्यामुळे उरलेल्या ७ मतदारसंघांपैकी ३ जागा अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दलाला सोडण्याचे तूर्त ठरले आहे. याखेरीज चार जागा शिल्लक राहत असून, त्या एखाद्या प्रादेशिक वा लहान पक्षाला सोडण्याचा या दोन्ही नेत्यांचा विचार आहे. मात्र, तो पक्ष कोणता असू शकतो, हे स्पष्ट झालेले नाही. सध्या केंद्रात मंत्री असलेल्या अपना दलाच्या अनुप्रिया पटेल भाजपा व रालोआवर नाराज आहेत. त्या रालोआतून बाहेर पडल्यास त्यांना त्या जागा सोडण्याबाबत हे दोन्ही नेते विचार करू शकतील. मात्र, तेही अद्याप ठरलेले नाही. या दोन नेत्यांची पुन्हा १५ जानेवारी रोजी बैठक होणार असून, त्यात या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षाशी आघाडी करण्यात काँग्रेसने सुरुवातीपासून रस दाखवला होता; पण काँग्रेसने वेळेत भूमिका स्पष्ट केली नाही आणि आम्ही त्या पक्षासाठी फार काळ थांबू शकत नाही, असे अखिलेश यादव यांनी बोलून दाखवले आहे. काँग्रेसची उत्तर प्रदेशात फारशी ताकद नसताना त्यांना आघाडीत घेण्याचे आणि त्यांच्यासाठी जागा सोडण्याचे कारण नाही, असे मायावती यांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस अधिक जागा मागेल, असे या दोन्ही नेत्यांना वाटल्यामुळेच त्यांनी आपापसात जागा वाटून घेण्याचा निर्णय घेतला असावा, असे समजते. समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी सांगितले की, आम्हा दोन्ही पक्षांतील आघाडीचा निर्णय झाला आहे. या आघाडीत आणखी कोणत्या पक्षाला सहभागी करून घ्यायचे आहे, याचा निर्णय अखिलेश यादव आणि मायावती लवकरच घेतील.
समझोता कशामुळे?
च्गेल्या वेळी उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. सपाचे पाच उमेदवार विजयी झाले होते, तर काँग्रेसतर्फे सोनिया गांधी व राहुल गांधी विजयी झाले होते. उरलेल्या दोन जागांवर अपना दलाचे उमेदवार जिंकले होते. त्यांना भाजपाचा पाठिंबा होता.
च्बसपाला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र, उत्तर प्रदेशात नंतर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांत सपा, बसपा, लोक दल व काँग्रेस एकत्र आल्याने भाजपाला तीन जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्यामुळेच यंदा सपा व बसपाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.