देहरादून - उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये रविवारी एक मोठा अपघात घडला. विकास नगरमध्ये चक्राताजवळ बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमधील बहुतांश लोक एकाच गावातील रहिवासी असल्याचेही सांगण्यात येत आहे.
हा अपघात रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडला. संबंधित बस 1300 फूट खोल दरीत कोसळल्यानंतर एकच आरडाओरडा सुरू झाली. यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बसखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनीच अपघाताची माहिती पोलिसांना दिली. यानंतर, काही वेळातच पोलीस आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्यात सहभागी झाले.
ओव्हरलोडिंगमुळे अपघात झाल्याची शक्यता - ओव्हरलोडिंगमुळे हा अपघात झाला असावा, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही बस छोटी होती, त्यात २५ जण बसलेले होते. ज्या मार्गावरून ही बस जात होती, त्या मार्गावर बसेसची संख्या फार कमी असल्याने, एकाच बसमध्ये अनेक लोक बसले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. धामी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'चक्राता परिसरातील बुल्हाड-बायला रस्त्यावर झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त करतो. ईश्वर मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जिल्हा प्रशासनाला बचाव आणि मदत कार्यात गती देण्याचे आणि जखमींना तातडीने उपचार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.'