देशात भाजपची सत्ता आल्यापासून गेल्या ७ वर्षांत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हाती कमळ घेतलं. याच नेत्यांमुळे अनेक राज्यांत भाजपनं सत्तेचा सोपान गाठला. भाजपच्या याच राजकारणामुळे काँग्रेसची अवस्था बिकट झाली. मात्र आता काँग्रेसनं भाजपला त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपनं तयार केलेल्या पिचवर काँग्रेसनं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये भाजपला धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे.
भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या यशपाल आर्य यांनी कालच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याआधी ते काँग्रेसमध्येच होते. आता विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी मुलगा संजीव आर्यसोबत घरवापसी केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे आमदार उमेश शर्मा काऊ यांचादेखील पक्षप्रवेश होणार आहे. तेदेखील आधी काँग्रेसमध्येच होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींची भेट घेतली आहे.
२०१६ मध्ये भाजपनं उत्तराखंडमध्ये काँग्रेसला सुरुंग लावला. आता तोच हिशोब काँग्रेसकडून चुकता केला जात आहे. यशपाल आर्य यांची घरवापसी विभागीय आणि जातीय समीकरणांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. आर्य दलित समाजातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना पक्षात आणून काँग्रेसनं राज्यात आणि राज्याबाहेर महत्त्वाचा संदेश दिला आहे. ऊधमसिंग नगर आणि नैनिताल जिल्ह्यातील निवडणूक समीकरणांवर प्रभाव टाकण्याची क्षमता आर्य यांच्याकडे आहे. जिल्ह्यातील अर्धा डझन विधानसभा मतदारसंघात त्यांचं प्राबल्य आहे.
आपला दबदबा असलेल्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आपणच ठरवू या अटीवर आर्य यांना काँग्रेसमध्ये घरवापसी केल्याची चर्चा आहे. आर्य काँग्रेसमध्ये गेल्यानं भाजपला धक्का बसला आहे. ऊधमसिंग नगर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा गृहजिल्हा आहे. धामी यांना मुख्यमंत्री दिल्याचा फायदा पक्षाला होईल अशी गणितं भाजपनं मांडली होती. मात्र आर्य यांच्या पक्ष बदलानं समीकरण बदलली आहेत.