नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यानंतर ते केदारनाथ येथे दाखल झाले आहेत. हेलिपॅडपासून जवळपास अर्धा किलोमीटर पायी चालत जाऊन त्यांनी बाबा केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले. मंदिरात पूजाअर्चना केली. शिवाय, येथे होणाऱ्या विकासकामांची पाहणीही केली. पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा केदारनाथ मंदिराला भेट दिली आहे. यावेळेस मंदिरात त्यांनी जलाभिषेकही केला. मंदिराला प्रदक्षिणाही घातली.
पूजा-अर्चना झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तेथील जनतेची भेट घेतली. त्यांच्यासोबत फोटोही काढले. दरम्यान, मंदाकिनी नदीवरुन एका नवीन रस्त्याची बांधणी करण्यात आली आहे. या रस्त्याची मोदींनी पाहणी केली.
दरम्यान, जून 203मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथे मोठ्या प्रमाणात जीवित-आर्थिक नुकसान झाले होते. यासंदर्भातील वास्तव सांगणारे एक फोटो प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर येथे पुनर्निर्माण तसंच पुनर्वसनाचे कार्य हाती घेण्यात आले होते, हे कार्य पूर्ण झाल्यानंतर स्वतःहून मोदी यांनी कामाची पाहणी केली. यानंतर 2017मध्ये पंतप्रधान मोदी यांनी दोनदा केदारनाथाचे दर्शन घेतले.