चेन्नई, दि. 12 - तामिळनाडूच्या राजकारणातून शशिकलांना जवळपास बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला आहे. AIADMKनं मंगळवारी व्ही. के. शशिकला यांना पार्टीच्या महासचिवपदावरून हटवलं आहे. त्यांचं महासचिवपद काढून घेण्यात आलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी बोलावलेल्या जनरल काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, शशिकलाचे भाचे आणि खासदार टीटीव्ही दिनाकरन यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.तत्पूर्वी तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी एक बैठक घेतली होती. दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवणे हाच या बैठकीचा उद्देश होता. तसेच शशिकला आणि दिनाकरन यांनी घेतलेले निर्णय हे पक्षाला लागू होणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच दिनाकरन यांना पाठिंबा देणा-या 14 आमदारांनी बहुतम सिद्ध करण्याची मागणी केली असून, त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली आहे. शशिकला उत्पन्नाहून अधिक संपत्ती जमवल्यामुळे तुरुंगात आहे. तर दिनाकरन यांना लाच दिल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय. दिनाकरनवर पक्षाच्या चिन्हासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. तर प्रकृती अस्वास्थ्यापायी शशिकलांचे पती रुग्णालयात उपचार घेत आहेत.
समझोत्याचा भाग म्हणून पक्षाचे समन्वयक म्हणून पनीरसेल्वम यांना नेमण्यात आले असून, मुख्यमंत्री उपसमन्वयक असतील. त्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही शपथविधी पार पडला. पनीरसेल्वम यांच्याकडे अर्थ खात्याबरोबरच गृहनिर्माणाशी संबंधित चार खाती तसेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहर नियोजन ही खाती देण्यात आली आहेत. त्यांचे विश्वासू के. पांडियराजन यांचाही शपथविधी पार पडला. याशिवाय पनीरसेल्वम गटाला आणखी मंत्रिपदे मिळणार आहेत. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्षाचा ताबा घेतल्यामुळे आणि पनीरसेल्वम यांना दूर करून पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात फूट पडली होती. पण आता त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पक्षात कोणतेही स्थान असणार नाही.