CoronaVirus News: २०२२मध्ये सर्वसामान्यांना मिळणार लस; साठवणुकीसाठी उपाय योजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:15 AM2020-11-09T01:15:56+5:302020-11-09T07:01:26+5:30
लस भारतीय बाजारपेठेत सहज उपलब्ध होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागेल.
नवी दिल्ली : देशात सर्वसामान्यांना कोरोना प्रतिबंधक लस २०२२पर्यंत मिळणे शक्य नाही, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. साथ रोखण्यासाठी केंद्राने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचेही ते सदस्य आहेत.
गुलेरिया म्हणाले की, लस भारतीय बाजारपेठेत सहज उपलब्ध होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागेल. लोकसंख्या मोठी असल्याने लस सहजपणे बाजारपेठेत उपलब्ध व्हावी यासाठी उपाय योजावे लागतील. या लसीसाठी लागणाऱ्या सिरिंज, सुया यांचा मुबलक साठा देशात केला जाईल.
ते म्हणाले की, लसीच्या साठवणुकीसाठी शीतगृहांची साखळी मजबूत हवी. पहिली लस बाजारात आल्यानंतर तिच्यापेक्षा दुसरी लस अधिक प्रभावी असेल तर तिला प्राधान्य देण्यात येईल. दुर्गम भागातील लोकांपर्यंत लस पोहोचावी असाच केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
लसीकरणामुळे कोरोनाची साथ संपूर्णपणे नष्ट होईल या भ्रमात कोणीही राहू नये. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती बंधने पाळून स्वत:ला सुरक्षित राखले पाहिजे.
- डॉ. रणदीप गुलेरिया, संचालक, एम्स