बडोदा : नवऱ्याच्या दारूच्या व्यसनापायी संसार मोडल्याच्या कित्येक घटना आपण ऐकत असतो. मात्र बडोद्यात एक अजब प्रकार घडला आहे. आपली पत्नी दारूची तस्करी करण्यासाठी आपल्यावर दबाव आणतेय, असा दावा करत एका निर्व्यसनी पतीने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आहे आणि घटस्फोटाचीच मागणी केली आहे. रमेश आपटे (४१ वर्षे) असं या पतीचं नाव आहे.
रमेश यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. गेली १५ वर्षं ते मसाला मिलमध्ये कामगार आहेत. परंतु, त्यांची पत्नी रेश्मा प्रचंड खर्चिक आहे. दर आठवड्याला चांगल्या हॉटेलात जाऊन जेवायचं, मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघायचा, महागड्या वस्तूंची खरेदी करायची हे तिचे छंद. स्वाभाविकच, रमेश यांच्या पगारात तिची ही हौस भागत नाही. त्यामुळेच जास्त पैसे कमावण्यासाठी ती आपल्यावर सतत दबाव आणते, दारूची तस्करी करावी असा हट्ट धरते, अशी रमेश यांची तक्रार आहे.
गुजरात राज्यात दारूबंदी आहे. त्यामुळे दारूची तस्करी करणाऱ्या टोळ्या तिथे सक्रिय आहेत. रेश्माचे काकाही दारू तस्करी करत असल्याचं रमेश यांनी म्हटलंय. त्यांच्यासोबतच रमेश यांनीही तस्करी केल्यास घरात भरपूर पैसा येईल आणि आपल्याला चंगळ करता येईल, असं रेश्माला वाटतं. परंतु, रमेश यांना या मार्गाने पैसा कमावणं मान्य नाही. दारूची तस्करी करण्यास आपण स्पष्ट नकार दिला असता, रेश्माने आपल्या वृद्ध आईला त्रास दिल्याचा आरोपही रमेश यांनी केला आहे. आता तिच्यासोबत संसार करण्याची इच्छा नसल्याचं रमेश यांनी सांगितलं.