योगींच्या हेलिकॉप्टरला पक्ष्याची धडक, वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 11:40 AM2022-06-26T11:40:47+5:302022-06-26T11:54:56+5:30
yogi adityanath : वाराणसीच्या पोलीस लाइनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सध्या योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
वाराणसी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकल्याची घटना रविवारी समोर आली आहे. यानंतर वाराणसीच्या पोलीस लाइनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सध्या योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस लाइनमधून त्यांचे हेलिकॉप्टर सुलतानपूरसाठी निघाले होते, मात्र पक्ष्याला धडकल्यानंतर पोलीस लाइनमध्येच त्यांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी केली जात आहे. हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर योगी आदित्यनाथ वाराणसीतील सर्किट हाऊसमध्ये काही काळ थांबले. योगी आदित्यनाथ आता विशेष विमानाने लखनौला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ लखनौमध्ये नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनौहून विशेष हेलिकॉप्टरने वाराणसीला पोहोचले होते. आपल्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी वाराणसीतील सर्किट हाऊसमध्ये लोकप्रतिनिधींची भेट घेतली. याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसी येथील परिषद शाळांमधील मुलांसाठी माध्यान्ह भोजनासाठी एलटी कॉलेज कॅम्पसमध्ये 24 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या सेंट्रलाइज्ड किचनची पाहणी केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीच्या नियोजित दौऱ्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला. याशिवाय, त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा सुद्धा केली.