जोधपूर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यावर काही आंदोलकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात वसुंधरा राजे थोडक्यात बचावल्या आहेत. वसुंधरा राजे जोधपूर जिल्ह्यातून जात असताना हा हल्ला करण्यात आला असून, हल्ल्याला काँग्रेसचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. वसुंधरा राजेंनी राज्यभरात गौरव यात्रा काढली आहे. या हल्ल्यानंतर वसुंधरा राजेंनी नियोजित कार्यक्रम रद्द केले असून, त्या विशेष विमानानं जोधपूरहून जयपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचंही वसुंधरा राजेंनी काँग्रेसला ठणकावून सांगितलं आहे.राजे म्हणाल्या, दगडफेक करण्याचा हा प्रकार काँग्रेस नेत्याच्या आदेशावरून झाला आहे. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, मी अशा हल्ल्यांना घाबरत नाही. मी राजस्थानसाठी स्वतःचा जीवही देण्यास तयार आहे. दगडफेक करून त्या लोकांनी स्वतःची हतबलता दाखवून दिली आहे. काँग्रेसनं विकासाचं कोणतंही कार्य केलेलं नाही. आम्ही पुन्हा राजस्थानमध्ये सत्ता हस्तगत करू, असा विश्वासही वसुंधरा राजेंनी व्यक्त केला आहे. ज्या आंदोलकांनी दगडफेक केली ते माजी मुख्यमंत्र्यांचं नाव घेत होते. त्यामुळे तो नेता अशोक गेहलोत असल्याचीही चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.काल रात्री 9.15 वाजता एका सभेला संबोधित करत वसुंधरा राजेंच्या बसवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांचा पाठलाग केला, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांना दगडफेक करणा-या आंदोलकांचे फुटेज मिळाले असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. राजस्थान काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार हिरालाल बिश्नोई यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. लोक भाजपावर नाराज आहेत, परंतु ही नाराजी दाखवण्यासाठी हिंसेचा मार्ग अवलंबू नये, असंही हिरालाल बिश्नोई म्हणाले आहेत.
वसुंधरा राजेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजपानं काँग्रेसवर केला हल्ल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 3:27 PM