अहमदाबाद -केंद्र सरकारच्या सूचनेनंतर महाराष्ट्रापाठोपाठ आता गुजरात सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली आहे. गुजरातमध्ये पेट्रोल 2 रुपये 93 पैसे, तर डिझेल 2 रुपये 32 पैशांनी स्वस्त करण्यात आले आहे. इंधनावरील व्हॅट 4 टक्क्यांनी घटवण्यात आला आहे. गुजरात सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 4 टक्क्यांनी व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला व घोषणादेखील केली.
यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी दोन रुपयांनी कमी केल्यानंतर सर्व राज्यांनाही व्हॅटमध्ये कपात करण्यासाठी पत्र पाठवले होते. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातने केंद्राच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
राज्यात पेट्रोल 2, तर डिझेल 1 रुपयाने स्वस्त
तर दुसरीकडे, राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्य दरामध्ये कपात करत सर्वसामान्य जनतेला दिवाळीपूर्वीच खूशखबर दिली आहे. पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपयांनी आणि डिझेल प्रतिलिटर एक रुपयानं स्वस्त करण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन विरोधकांनी सरकरला चांगलेच अडचणीत पडले होतं. इंधन दरवाढीबाबत झालेल्या चहूबाजूच्या टीकेनंतर पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी करणार असल्याची माहिती मुनगंटीवारांनी ट्विटरवरुन दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने दिलेल्या गुड न्यूजमुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 25 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 26 टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे 11 रुपयांचा अधिभार आकारला जातो.
डिझेलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 21 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 22 टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार आकारला जातो. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमधून सरकारला 19 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई करते.