नवी दिल्ली : ईशनिंदेच्या आरोपात दोषी ठरवून 26 वर्षाची शिक्षा सुनावल्याबद्दल, पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने आश्चर्य व्यक्त केले असून, यामुळे धक्काच बसला, असे म्हटले आहे. मी काहीही चुकीचे केले नाही, त्यामुळे या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे. हा निकाल फारच लवकर लागला, कारण दोन महिन्यांपूर्वी मी अमेरिकेत असताना हा खटला सुरू झाला. मी न्यायालयात उपस्थित नसताना हा निकाल देण्यात आला; पण मी आता उच्च न्यायालयात जाणार आहे, असे तिने सांगितले.
जिओ टीव्हीवर प्रसारित कार्यक्रमात वीणा मलिक व तिचे पती यांचा विवाह दाखविला होता. त्यात तिने आपल्या पतीबरोबर नृत्य केले व त्यावेळी सूफी गीताची धून वाजविण्यात आली. न्यायालयाने हा प्रकार दोषी ठरवला आहे, असे मलिक म्हणाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)