प्रतिशोध, नोंदणीवरून हिंसाचार, डॉ. मनीष दाभाडे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 06:24 AM2020-01-07T06:24:03+5:302020-01-07T06:24:11+5:30
विद्यार्थी नोंदणीच्या अखेरच्या दिवशी विद्यापीठातील नोंदणी कक्ष डाव्या विद्यार्थी संघटनांनी लक्ष्य केल्याने त्याला उत्तर देण्यासाठी अभाविपचे पदाधिकारी आक्रमक झाले.
नवी दिल्ली : विद्यार्थी नोंदणीच्या अखेरच्या दिवशी विद्यापीठातील नोंदणी कक्ष डाव्या विद्यार्थी संघटनांनी लक्ष्य केल्याने त्याला उत्तर देण्यासाठी अभाविपचे पदाधिकारी आक्रमक झाले. जमावाने थेट वसतीगृहात एकेका रुममध्ये जाऊन विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्याचा हा प्रकार विद्यापीठाच्या आवारात आजवर कधी झाला नसल्याचे प्रा. डॉ. मनीष दाभाडे यांनी लोकमतला सांगितले.
ते म्हणाले की, विद्यापीठाने काही प्रमाणात शुल्क कमी केले आहे. तर, जे दारिद्र्यरेषेखाली कुटुंबांचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शुल्कवाढ केलेली नाही. त्यातच हिवाळी सत्रातील विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी सुरू होती. त्याचा रविवारी शेवटचा दिवस होता. जोपर्यंत शुल्कदरवाढ पूर्णपणे मागे घेतली जात नाही तोवर ही नोंदणी केली जाऊ नये, अशी भूमिका डाव्या विद्यार्थी संघटनांची आहे. तर, ही नोंदणी करण्यात यावी, अशी भूमिका अभाविपची आहे. रविवारी अखेरचा दिवस असताना नोंदणी कक्षातील सर्व्हर आणि अन्य बाबींची तोडफोड डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली. नोंदणीच्या या मुद्द्यावरुन अभाविपचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रविवारी सायंकाळी विद्यापीठाच्या आवारात घुसले. विशेष म्हणजे, त्यात विद्यापीठाच्या बाहेरचेही अनेक कार्यकर्ते होते. त्यांच्या हातात काठ्या आणि हत्यारे होती.
सरस्वती आणि पेरियार या वसतीगृहातील प्रत्येक रुममध्ये जाऊन त्यांनी दहशत माजवली तसेच हिंसाचार केला. टोळक्याने प्राध्यापकांनाही मारहाण केली.