जीवाची पर्वा न करता रुग्णवाहिकेला दाखवली वाट; व्यंकटेशला मिळाला शौर्य पुरस्काराचा मान!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 10:17 AM2020-01-29T10:17:09+5:302020-01-29T10:23:32+5:30
मुसळधार पावसामुळे कर्नाटकमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने 49 मुलांना सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय आणि विधायक कार्याची दखल घेत सरकारने या पुरस्कारांची घोषणा केली. शौर्य पुरस्कारांच्या यादीत कर्नाटकमधील 12 वर्षीय व्यंकटेशचा देखील समावेश आहे.
मुसळधार पावसामुळे कर्नाटकमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक लोकांचे देखील मोठ्या प्रमाणात नूकसान झाले होते. तसेच यामध्ये 60 लोकांचा मृत्यू देखील झाला होता. कर्नाटकमधील रायचूरु जिल्ह्यातील हरियानकुंपे गावातही सर्वत्र पाणी जमा झाले होते. याचदरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा पाणी साचलेल्या रोडवरुन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता दाखवत होता तो म्हणजे व्यंकटेश.
रिपोर्ट्सनूसार, पाण्यामधून जाणाऱ्या रुग्णवाहिकेत सहा मुलांसह एका महिलेचा मृतदेह देखील होता. मात्र पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्याने रुग्णवाहिकेच्या चालकाला रस्त्याचा नेमका अंदाज येत नव्हता. रुग्णवाहिकेला अडचण येत असल्याचे व्यंकटेशला दिसतान त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यामधून धावत रुग्णवाहिकेला रस्ता दाखवला होता. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्यंकटेशची प्रशंसा करण्यात आली होती. तसेच व्यंकटेशने बजावलेल्या कामाची दखल सरकारलाही घ्यावी लागली.