ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा कालवश

By admin | Published: December 2, 2014 09:30 AM2014-12-02T09:30:46+5:302014-12-02T10:11:28+5:30

विनोदी शैलीने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचे मंगळवारी पहाटे पुण्यात ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Veteran actor Deven Verma Kalvash | ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा कालवश

ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा कालवश

Next

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २ - विनोदी शैलीने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचे मंगळवारी पहाटे पुण्यात ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अंगूर, खट्टा मिठा, चोर के घर चोर या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. 

 २३ ऑक्टोबर १९३७ मध्ये जन्मलेले देवेन वर्मा यांचे शिक्षण पुणे विद्यापीठातून झाले. महाविद्यालययीन जीवनापासून नाटकांमध्ये सहभागी होणारे देवेन वर्मा हे त्या काळी दिग्गज कलाकारांची मिमीक्री करायचे. उत्तर भारताच्या संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात देवेन वर्मा एकपात्री प्रयोग सादर करत होते व हा प्रयोग बी. आर. चोप्रा यांनी बघितला. यानंतर चोप्रा यांनी देवेन वर्मा यांना धर्मपूत्र या चित्रपटात संधी दिली. १९६१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सपशेल आपटला. चित्रपटातील पदार्पण अपयशी ठरले असले तरी वर्मा यांनी एकपात्री प्रयोग करणे सुरुच ठेवले होते. १९६३ साली प्रदर्शित झालेल्या गुमराह या चित्रपटात देवेन वर्मा यांनी अशोक वर्माच्या नोकराची भूमिका केली होती. ही विनोदी भूमिका प्रेक्षकांनाही भावली व यानंतर देवेन वर्मांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला. एका वेळी तब्बल १६ चित्रपटांसाठी काम करण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पार पाडले होते. दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांची कन्या रुपा गांगुली यांच्याशी देवेन वर्मा यांनी विवाह केला. 

अंगूर, चोर के घर चोर, चोरी मेरा काम या चित्रपटांमधील विनोदी भूमिकेसाठी त्यांनी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. गोलमाल, जुदाई, खट्टा मीठा, नास्तिक, चमत्कार, अंदाज अपना अपना, इश्क, दिल तो पागल है, मेरे यार की शादी है या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या. देवेन वर्मा यांनी १४९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. दोस्त असावा तर असा या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले होते. कोणताही अंगविक्षेप व अश्लीलतेचा आधार न घेता दर्जेदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणे हे वर्मा यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी स्वतःचा प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते. सिनेसृष्टीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ते पुन्हा पुण्यात परतले.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांना किडनीच्या आजारानेही ग्रासले होते. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने देवेन वर्मा यांचे निधन झाले. आज दुपारी येरवडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनामुळे सिनसृष्टीतील एका विनोदी पर्वांचा अंत झाला अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

Web Title: Veteran actor Deven Verma Kalvash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.