उपराष्ट्रपतींमुळे आली बहार! राजधानी दिल्लीत ‘मराठी लोकमत’चे मराठीतून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 05:09 AM2017-12-16T05:09:32+5:302017-12-16T07:37:43+5:30
माध्यमांच्या स्वातंत्र्याची खणखणीत पाठराखण करताना ‘स्वयं-नियमना’च्या मुद्द्यावर ठेवलेले आग्रही बोट आणि मातृभाषेतच बोलण्या-वागण्या-विचार करण्याचा आग्रह धरताना फुलून आलेली भाषिक सौंदर्याची आतषबाजी...
माध्यमांच्या स्वातंत्र्याची खणखणीत पाठराखण करताना ‘स्वयं-नियमना’च्या मुद्द्यावर ठेवलेले आग्रही बोट आणि मातृभाषेतच बोलण्या-वागण्या-विचार करण्याचा आग्रह धरताना फुलून आलेली भाषिक सौंदर्याची आतषबाजी... उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी राजधानी दिल्लीत ‘मराठी लोकमत’चे मराठीतून स्वागत करताना अशी काही बहार उडवून दिली, की संपूर्ण सभागृह मिश्कील लकेरीपासून खळाळत्या हास्याच्या धबधब्यात अक्षरश: बुडून गेले.
माध्यमांचा एकूण व्यवहार हा पुराच्या ओसंडणाºया प्रवाहासारखा असतो. त्यातली उत्स्फूर्तता कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे उलटे फिरलेले पाणी नाकातोंडात जाण्याचा धोका नजरेआड करता कामा नये, अशा स्पष्ट शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी माध्यम स्वातंत्र्याचे सार्वकालिक महत्त्व अधोरेखित केले. मात्र याचा अर्थ माध्यमांनी अनिर्बंध स्वातंत्र्याचा हट्ट धरावा, असे नव्हे. सामाजिक सलोख्यावर आपल्या वृत्तांकनाचा विपरीत परिणाम होणार असेल, तर कायदे-सरकार यंत्रणांना मध्ये पडण्यावाचून पर्याय असणार नाही, याचे भान माध्यमांनी बाळगावे आणि स्वनियंत्रणाच्या मार्गापासून ढळू नये, असेही नायडू यांनी बजावले.
सत्ताधारी आणि सत्तास्थानापासून आपण दूर आहोत. आपला आवाज कुणापर्यंत पोहोचत नाही, आपला कुणी त्राता नाही, अशा उद्वेगातून ग्रामीण भारतातील वंचित माणसे शहराकडे स्थलांतरित होत राहतात. हे स्थलांतर रोखायचे तर त्यासाठी देशाच्या कानाकोपºयातून मतभेदांचे, संताप आणि अडचणींचे आवाज राजधानीतील सत्तास्थाने आणि सत्ताधीशांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रादेशिक भाषांमधल्या माध्यमांनीच उचलली पाहिजे. अभाव आणि वंचनेच्या कहाण्या उजेडात आणून या परिघाबाहेरच्या माणसांसाठी लढले पाहिजे, अशी अपेक्षाही उपराष्ट्रपतींनी तळमळीने मांडली. ‘लोकमत समूह’ ही जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहे, याचा आपणास आनंद आहे, असेही उपराष्ट्रपतींनी बोलून दाखविले.
मराठी, लोकमत आणि मार्केट
‘घरी मी रोज सकाळी १८ वर्तमानपत्रे वाचतो; पण माझ्या तेलुगू भाषेतला ‘इनाडू’ वाचल्याशिवाय माझे समाधान होत नाही,’ अशी मिश्कील कबुली देत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मातृभाषेशी असलेले प्रत्येकाचे जिव्हाळ्याचे नाते मोठ्या वेधकपणे उलगडले.
तोच धागा पकडून ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा आपल्या भाषणात म्हणाले, महाराष्टÑातून आलेल्या दिल्लीकरांना आणि आपल्यालाही आता दिल्लीत लोकमत वाचल्याशिवाय चैन पडणार नाही... त्यावर उपराष्टÑपतींनी हसून दाद दिली.
इथे गडकरी आहेत, जावडेकर आहेत; हे सगळेच अर्थातच मराठी वर्तमानपत्रे प्रथम वाचतील; म्हणजे पाहा, इथूनच लोकमतचे मार्केट सुरू झाले आहे, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला, तेव्हा सभागृह व व्यासपीठालाही
हसू आवरले नाही.
मराठी माणूस मोठा जिद्दीचा असतो. तो सुशिक्षित, सुविद्य आणि सजगही असतो. त्यामुळे दिल्लीतल्या मराठी कुटुंबांमध्ये लोकमतची लोकप्रियता आणि गरजही झपाट्याने वाढेल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला.
लोकहिताचे खरे मत : लोकमत
माध्यमांकडून असलेला सेल्फ रेग्युलेशनचा आग्रह म्हणजे सेल्फ स्ट्रँग्युलेशन (स्वत:च्याच गळ्याला फास लावणे) नव्हे, असे सांगताना उपराष्ट्रपतींच्या शब्दचातुर्याची प्रचितीही सर्वांना आली. लोकमतचा गौरवही आपल्या खास शैलीत केला. ते म्हणाले की, लोकहित सांभाळण्याचा वसा घेतलेले लोकमत हे जनमतांचे प्रतिबिंब असण्यामध्येच त्याचे खरे सार्थक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे!
धिस इज लाइफ विदाऊट वाइफ
शाब्दिक कोट्या आणि गमतीच्या शब्दखेळांनी संसदेची सभागृहे गारद करणारे उपराष्ट्रपती 'लोकमत'च्या समारंभात विशेष खुलले होते. त्यांच्या खळ्या-कोपरखळ्यांनी कार्यक्रम बहारदार झाला. उपराष्ट्रपती झाल्यापासून सुरक्षा, शिष्टाचाराची मोठीच जबाबदारी गळ्यात पडली आहे. त्यामुळे लोकांना मोकळेपणाने भेटता येत नाही. नव्या-जुन्या स्नेही-सोबत्यांशी हास्यविनोद, गप्पाटप्पा करण्यावर मोठीच बंधने येतात. त्याबद्दल नायडूंनी गमतीच्या सुरात नाराजी व्यक्त केली. हे असे नीरस आयुष्य म्हणजे जणू 'लाइफ विदाऊट वाइफ' आहे, या त्यांच्या टिप्पणीवर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.
कन्फर्म्ड 'इन्फर्मेशन'चे अॅम्युनेशन
कन्फर्मेशन (सत्याची खात्री) असलेली इन्फर्मेशन (माहिती) हे ग्रेट अॅम्युनेशन (म्हणजे दारुगोळ्यासारखी स्फोटक) असते; अशी कोटी करताना नायडू म्हणाले, माध्यमांना लागलेली सनसनाटीची सवंग हौस आणि टीआरपी अथवा खपाच्या-लोकप्रियतेच्या हव्यासापायी जडलेला अनावर वेगाचा रोग घातक आहे. 'सत्या'वर अविचल निष्ठा ठेवून समाजाच्या व्यापक हितासाठी (सत्यम) हाती लागलेले सत्य (शिवम) नेमकेपणाने मांडणे (सुंदरम) हा माध्यमांसाठी 'सत्यम शिवम सुंदरम'चा अर्थ असला पाहिजे, अशी मांडणीही त्यांनी केली.
बातमीचे ‘मूूल्य’
‘मूल्य’ हे वर्तमानपत्राचे असावे; त्यात छापलेल्या बातमीला मात्र रुपया-पैशातले ‘मूल्य’ असता कामा नये, असे स्पष्ट सांगत ‘पेड न्यूज’च्या विरोधात परखड भूमिका उपराष्ट्रपती नायडूंनी मांडली. माध्यमांनी सत्याचे पाठीराखे असलेच पाहिजे आणि त्यांच्या केंद्रस्थानी वंचितांचे प्रश्न असले पाहिजेत, याविषयी उपराष्टÑपती कमालीचे आग्रही होते.
हॉकर्सविषयी कृतज्ञता!
ऊन, पाऊस, वादळ, थंडीची पर्वा न करता लोकांपर्यंत सकाळी वृत्तपत्र पोहोचवणारे हॉकर्स आमच्यासाठी देशभक्त आहेत, अशी कृतज्ञतेची भावना लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी व्यक्त केली. लोकमतच्या स्थापनेस शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. दिल्लीतील शताब्दी समारंभात ते बोलत होते.
स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांनंतरही समाजात असंवेदनशीलता दिसते. धार्मिक घटनांमुळे समाजात अस्वस्थता पसरते. गेल्या दोन दशकांपासून देशातील धार्मिक वातावरण बिघडले आहे. माध्यमांची जबाबदारी त्यामुळेच मोठी आहे. या घटनांच्या मुळाशी माध्यमांनी गेले पाहिजे. सारासार विचार करूनच धार्मिकदृष्ट्या संवेदनशील घटनांचे वार्तांकन व्हायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
'सखी मंच'च्या माध्यमातून महिला सबलीकरण, युवकांसाठी 'युवा मंच' तर 'बालविकास मंच'द्वारे शालेय विद्यार्थ्यांवर लोकमत संस्कार करतो, असे ते म्हणाले. दिल्लीकरांसाठी लोकमत हक्काचे व्यासपीठ असेल. दिल्लीतल्या सामान्य माणसाचा आवाज, त्यांच्या समस्या आम्ही सत्ताधा-यांपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दिल्ली आणि मराठी!
गेल्या शतकात ‘हिमालया’च्या मदतीला ‘सह्याद्री’चा स्फूर्तिदायी इतिहास अभिमानाने जपणाºया महाराष्ट्राचे वर्तमानच दिल्लीशी जोडणारी ‘लोकमत’ची दिल्ली आवृत्ती हा खरे तर अनेक नव्या गोष्टींचा प्रारंभ.
महाराष्ट्र आणि दिल्लीचे नाते अनेक पदरी, गुंतागुंतीचेही. या रेशमी गुंत्याला दुतर्फा संवादाचा नवा आयाम देणारे ‘लोकमत’चे पहिले मराठी पाऊल राजधानीत मोठ्या दमदारपणे पडले. दिल्लीत काही लाख मराठी माणसे राहतात. त्यांच्यातल्या अनेकांची घरे आजोबा-पणजोबांच्या काळी इंद्रप्रस्थकडे सरकली. मराठी फौजांबरोबर उत्तरेकडे आलेल्या आणि परतताना वाटेत राहून गेलेल्यांच्याही वास्तव्याच्या मराठी खुणा इथे फुलल्या, बहरल्या. आधुनिक काळातील नोकरी, उद्योगांनीही भौगोलिक सीमेपल्याड झेपावलेल्या माणसांना दिल्लीत बोलाविले. उद्योजक, राजकीय नेते, कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षांपासून भाषा, विज्ञान-तंत्रज्ञानातल्या उच्चशिक्षणासाठी आलेले विद्यार्थी असा दिल्लीतला मराठी चेहरा बहुरंगी!
या मराठी माणसांचे प्रतिनिधित्व आता ‘लोकमत’ची दिल्ली आवृत्ती करेल. आता आमच्या घरी आमचे वर्तमानपत्र येईल आणि माहेरच्या ताज्या बातम्या गरम भाकरीसारख्या रोज तव्यावरून ताटात पडतील, असे मोठ्या आनंदाने नमूद करीत, राजधानीतल्या मराठी घरांनी आणि मंडळींनी ‘लोकमत’चे दिल्लीत उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.
अमिताभच्या नजरेतला ‘लोकमत’
वृत्तपत्र ही दुनियेचा विलोभनीय नजारा दाखवणारी एक विलक्षण खिडकीच असते...असावी. त्यातून जे दिसते, त्याचे मोल कोणाही सूज्ञ वाचकासाठी हिºया-माणकांच्या खजिन्यापेक्षा मोठे असते. ‘वृत्तपत्र’ म्हणजे जणू त्या-त्या राष्ट्राने स्वत:शी केलेला संवाद!
छापले जाणारे वृत्त वाचले जाते ते नजरेने, पण जे वाचले जाते, त्यातल्या आशयाच्या नेमकेपणाने वाचकांच्या विचारांनाच नव्हे, तर कृतीलाही उद्युक्त करण्याची ताकद ‘लोकमत मीडिया’ने कमावली आहे. देशातल्या पहिल्या दहा सर्वोच्च वृत्तपत्रांमध्ये स्थान मिळविणे आणि महाराष्ट्र व गोव्यातही निर्विवाद अग्रस्थान कायम राखणे ‘लोकमत’ने साधले, ते याच ताकदीच्या बळावर! पत्रकारिता वर्तमानपत्राचे भान देते. संभ्रमात टाकणा-या जागतिक बदलांच्या पोटात काय दडले आहे, जगाच्या हृदयात काय घडते-बिघडते आहे, हे समजून घेण्याचा हा सर्वांत जवळचा, विश्वासार्ह मार्ग!
‘लोकमत’ माध्यम समूह राजधानी दिल्लीत पदार्पण करतो आहे. या शुभारंभाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा! जग बदलते आहे. पेलणे अवघड तरी वेगाने सारे बदलते आहे. या बदलांचे बोट धरून पाऊल पुढे टाकत शिकणाºया तरुणांना ‘लोकमत’ने आधार द्यावा. मदत करावी. जबाबदारीचे आत्मभान द्यावे...जगल्या-वागल्या, शहाण्या-सुरत्या सूज्ञ ज्येष्ठांना त्यांच्या सवयीचे सारे हातून सुटून जात असताना, ही अपरिचित दुनिया समजून घ्यायला, बदलांशी आनंदाने जुळवून घ्यायला बळ पुरवावे.जगल्या-वागल्या, शहाण्या-सुरत्या सूज्ञ ज्येष्ठांना त्यांच्या सवयीचे सारे हातून सुटून जात असताना, ही अपरिचित दुनिया समजून घ्यायला, बदलांशी आनंदाने जुळवून घ्यायला बळ पुरवावे.