PM Narendra Modi ( Marathi News ) : संसदेत झालेल्या घुसखोरीवरून आक्रमक भूमिका मांडणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाचा सपाटा सुरू आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत मागील काही दिवसांत तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर संसद परिसरात काल विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. मात्र या आंदोलनादरम्यान एका खासदाराने थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. उपराष्ट्रपतीपदावरील व्यक्तीची खिल्ली उडवली गेल्याने या कृतीची देशभरात मोठी चर्चा झाली. सत्ताधारी भाजपच्या विविध नेत्यांनी या कृतीचा निषेध करत विरोधकांवर निशाणा साधला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना फोन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज फोनवरून संवाद झाला. संसद परिसरात खासदारांनी केलेली घृणास्पद कृती वेदनादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी मागील २० वर्षांपासून सातत्याने असा अपमान सहन करत आहे. मात्र भारताच्या उपराष्ट्रपतीपदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत संसद परिसरात अशी कृती होणं दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले," अशी माहिती उपराष्ट्रपतींनी त्यांच्या 'एक्स' हँडलवरून दिली आहे.
नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संवादाविषयी अधिक माहिती देताना जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे की, "काही सदस्यांच्या अशा कृतीने मी माझ्या जबाबदारीपासून मागे हटणार नाही. संविधानातील मूल्यांच्या प्रती माझी मनापासून निष्ठा आहे. कोणताही अपमान मला माझ्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नसल्याचं मी पंतप्रधानांना सांगितलं."
दरम्यान, भाजप खासदाराकडून पास घेतलेल्या चार तरुणांनी मागील आठवड्यात संसदेत घुसखोरी केली होती. घुसखोरीच्या मुद्द्यावरून संसदेत मोठा गदारोळ झाला होता. कामकाज सुरू होताच लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर दोन्ही सभागृहांतून खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरू झालं आणि आतापर्यंत तब्बल १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.