नवी दिल्ली - 'दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम आहे. कोणाच्या मदतीची गरज नाही. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करून हे दाखवून दिलं आहे' असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. पॅराग्वे दौऱ्यादरम्यान बुधवारी (6 मार्च) भारतीय समुदायासमोर बोलत असताना व्यंकय्या नायडू यांनी असं सांगितलं आहे.
व्यंकय्या नायडू यांनी 'आमचे संरक्षण करण्यास आम्ही तयार आहोत, कारण पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने पाकिस्तानला ज्या प्रकारे चोख प्रत्युत्तर दिलं त्यावरुन याची प्रचिती येते. या हल्ल्यामध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सैन्यावर किंवा नागरिकांवर हल्ला केला नाही. त्यामुळे कोणालाच त्रास झाला नाही, केवळ दहशतवाद्यांना त्रास सहन करावा लागला' असं म्हटलं आहे. तसेच 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे, याला कुठलाही धर्म नसतो. दहशत माजवणे हे वाईटपणाचे लक्षण आहे. दहशतवाद जगाच्या पाठीवरुन नष्ट झाला पाहिजे. मात्र, त्यासाठी दहशतवादाविरोधात जगातील सर्व नागरिकांनी एकजूट व्हायला हवं' असंही त्यांनी सांगितलं.
'आम्हाला युद्ध नको आहे मात्र जर कोणी मुद्दाम आमची छेड काढली तर आम्ही त्याला सोडणार नाही' असंही व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. आपल्या शेजारील राष्ट्राने दहशतवाद हे त्यांच्या देशाचे धोरणच ठरवले आहे. हा देश या दहशतवाद्यांना अन्न, पैसा आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत आहे. मात्र, आता ते घाबरले आहेत. ते जरी सार्वजनिकरित्या दहशतवाद रोखण्याचे दावे करत असले तरी दहशतवादाला पैसा पुरवण थांबवत नाहीत, असा दावा व्यंकय्या नायडू यांनी केला आहे.
पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.