मुजफ्फरनगर - भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत विक्रम सिंह सैनी यांनी आपत्तीजनक विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वी सैनी यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून पंडित नेहरुंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याबाबत पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.
पंडित नेहरु हे अय्याश होते. त्यांचे कुटुंबही अय्याश आहे. इंग्रजांच्या नादाला लागून नेहरुंनी देशाचं विभाजन केलं. राजीव गांधी यांनी इटलीत लग्न केलं, यांची सगळी कामं अशीच आहे अशा शब्दात भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र भाजपा आमदाराच्या या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी यांनी कलम 370 हटवल्यानंतरही विवास्पद प्रतिक्रिया दिली होती. विक्रम सिंह सैनी यांनी सांगितले होते की, देशातील मुस्लिमांना या निर्णयामुळे आनंद व्हायला हवा कारण आता त्यांना न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींसोबत लग्न करता येणार आहे. इतकचं नाही तर भाजपाच्या अविवाहित युवा नेतेही काश्मीरला जाऊन प्लॉट विकत घेऊ शकतील आणि लग्न करु शकतील असं विधान भाजपा आमदाराने केलं होतं.
मुजफ्फरनगरच्या कार्यक्रमात बोलताना भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी म्हणाले की, मोदी यांनी आपल्या सगळ्याचं स्वप्न साकार केलं आहे. भाजपाचे अविवाहित नेते आहेत त्यांना काश्मीरला जाऊन लग्न करता येईल यात आमची कोणतीही अडचण नाही. भाजपाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनाही काश्मीरच्या गोऱ्या मुलींसोबत लग्न करता येईल असं त्यांनी सांगितले होते.
13 सप्टेंबर रोजी विक्रम सिंह सैनी यांनी फेसबुकवर एक फोटो अपलोड केला होता. त्यात एक परदेशी महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहत होती तर नरेंद्र मोदी दुसरीकडे पाहत असल्याचा फोटो होतो. त्यावर विक्रम सिंह यांनी 'गलत नजर न डाल पगली, मोदी हैं नेहरु नहीं' अशा शब्दात कमेंट केली होती. यावरुन पत्रकारांनी विक्रम सिंह सैनी यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी माफी मागण्याऐवजी नेहरु कुटुंबीयांबद्दल खालच्या शब्दात टीका केली.