अहमदाबाद - महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्येहीपूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर अन् सांगलीप्रमाणेच गुजरातमधील मोरबी येथेही असाच महापूर आला आहे. या संकटसमयी आपले कर्तव्य बजावतानाचा एका पोलीस हवालदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोरबी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या पृथ्वीराज जडेजा यांच्या कार्याला लाखो लोकांनी सॅल्यूट केला आहे.
मोरबी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात अडकलेल्या दोन चिमुकल्यांना वाचवताना तुम्हाला श्रीकृष्ण मालिकेतील तान्हुल्या कृष्णाला घेऊन जाणाऱ्या वासुदेवाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. महापूराच्या पाण्यातून वाट काढताना पृथ्वीराज जडेजा यांनी चक्क 1.5 किलो मीटरचा प्रवास केला. या प्रत्येक पावलागणीस ते जपून जपून पुढे चालत होते. कारण, स्वत:साठी नव्हे तर आपल्या खांद्यावर असलेल्या दोन चिमुकल्यांचा जीव वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. चोहोबाजुंनी पाण्यानं वेढलेलं असतानाही तब्बल दीड किलो मीटरचं अंतर या बहाद्दर पोलीस शिपायानं पार केलंय. सोशल मीडियावर या पोलिसाच्या कर्तव्यदक्षतेला सलाम ठोकला जात आहे. तर, अनेकजण खाकी वर्दीतला माणूस म्हणून जडेजा यांच कौतुक करत आहे. विशेष म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही ट्विट करुन पोलीस शिपाई पृथ्वीराज जडेजा यांच कौतुक केलं आहे.
पोलीस शिपाई पृथ्वीराज जडेजा हे आपल्या कामात नेहमीच स्वत:ला झोकून देऊन कार्य करणाऱ्यापैकी एक आहेत. सरकारी नोकरीतही कामाबद्दलची कर्तव्यदक्षता आणि नागरिकांप्रती तळमळ याच उदाहरण म्हणजे जडेजा होय. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेला कौतुक, असे म्हणत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनीच पृथ्वीराज यांना सॅल्यूट केला आहे. दरम्यान, गावातील लोकांच्या मदतीने पृथ्वीराज यांनी 45 लोकांना पाण्यातून बाहेर काढले आहे.