आज ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. परंतु, या रॅलीला आता हिंसक वळण लागले आहे. दिल्लीपोलिसांनी ठिकठिकाणी अडवल्यामुळे पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमधील संघर्ष वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांवर दगडफेक आणि ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर बचावात्मक पवित्रा पत्करत पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराचे नळकांडी फोडली.
गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. आज शेतकऱ्यांकडून दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहण्यास मिळाले आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र असून तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचं दृश्य पहायला मिळत आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन (परेड) पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला होता. मात्र, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर आणि तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार होते.