बंगळुरु - कर्ज फेडत नसल्याने एका महिलेला पोलला बांधून अमानुष मारहाण केल्याची घटना बंगळुरुमध्ये घडल्याची समोर येत आहे. एका 36 वर्षीय महिलेला बंगळुरुच्या रामनगर जिल्ह्यातील तवारेकेरे गावात पोलला बांधून मारहाण केली आहे. त्या महिलेने 12 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पिडीत महिलेचं नाव राजम्मा असं आहे.
पोलिसांनी सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ तवारेकेरे गावात जाऊन राजम्मा यांना वाचविलं तसेच मारहाण करणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. ही महिला चमराजनगर जिल्ह्यातील कोल्लेगल या गावातील रहिवाशी आहे. पोलिसांनी सांगितले की, राजम्मा यांना मारहाण करणाऱ्या इतर गावकऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही वर्षांपूर्वी राजम्मा या गावात येऊन राहिली होती. गावात हॉटेल सुरु करण्यासाठी तिने काही जणांकडून 12 लाख रुपये कर्ज म्हणून घेतलं होतं. मात्र हॉटेल व्यवसायात यश न मिळाल्याने राजम्माला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागलं.
जेव्हा गावकऱ्यांनी तिच्याकडे कर्ज घेतलेले पैसे परत करण्यासाठी वारंवार मागणी केली त्यानंतर गावातून घर रिकामं करुन पळून जाण्याचा प्रयत्न राजम्माने केला. त्यावेळी गावकऱ्यांनी तिला पकडून एका खांबाला बांधून तिला मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणात दोषी गावकऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तसेच 8 गावकऱ्यांना अटक केली आहे.