नवी दिल्ली- दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनच्या ट्रॅकवर उतरून प्लॅटफॉर्म बदलण्याचा प्रयत्न करणं एका तरूणाच्या चांगलंच जीवावर बेतलं असतं. पण ड्रायव्हरने वेळेवर ब्रेक मारल्याने तरूणाचा जीव थोडक्यात वाचला. मयुर पटेल (वय 21) असं मेट्रो रूळ ओलांडणाऱ्या तरूणाचं नाव आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. दिल्लीच्या शास्त्रीनगर मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली. ड्रायव्हरच्या सजगतेमुळे तरूणाचा जीव वाचला.
शास्त्रीनगर मेट्रोस्टेशनवरील ही घटना स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. एक मुलगा रूळावर उतरून एक प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करतो आहे. विशेष म्हणजे त्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर मेट्रो उभी असताना तो मुलगा प्लॅटफॉर्म चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे. मुलगा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात असताना तेथे असलेली मेट्रो सुरू होते. घाईघाईने मुलगा प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा पाय घसरताना दिसतो आहे. यावेळी ड्रायव्हरने लगेचच ब्रेक मारल्याने मेट्रो थांबून त्या मुलाला प्लॅटफॉर्मवर चढता आल्याचं पाहायला मिळतं आहे.
अधिकाऱ्यांनी मयुरला याबद्दल विचारणा केल्यावर तो म्हणाला, एक प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर कसं जायचं, याबद्दलची माहिती नव्हती. मेट्रो रूळ ओलांडणं हा गुन्हा आहे. असं करणाऱ्याला व्यक्तीला दंड होऊ शकतो. किंवा सहा महिन्याचा तुरूंगावासही होऊ शकतो.