नवी दिल्ली - जम्मू काश्मीरचे एसपीओ बिलाल अहमद मागरे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मरणोत्तर शौर्य पुरस्कारने गौरविण्यात आले. बिलाल अहमद यांची आई सारा बेगम यांनी मंगळवारी शौर्य पुरस्कार स्विकार केला. यावेळी, मुलाच्या पराक्रमाची गाथा राष्ट्रपती भवनमध्ये ऐकताना माऊली सारा बेगम भावूक झाल्या होत्या, त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. हे पाहून शेजारील महिला शिपायाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला.
सारा बेगम यांची अवस्था पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुढे येत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सारा बेगम यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीरनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, राष्ट्रपती भवनात श्वास घेताना त्रास होणाऱ्या सारा बेगम यांना पाहून गंभीरने ट्विट केले आहे की, तुम्ही आणि मी जो मोकळा श्वास घेतोय, तो सारा बेगम यांच्यासारख्या माऊलींमुळेच. गौतमचे ते गंभीर शब्द आणि अतिशय भावूक करणारा हा व्हिडिओ अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळतून जातोय.
बिलाल अहमद हे जम्मू काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्यावर होते. 20 ऑगस्ट 2019 रोजी सुरक्षा जवानांना दहशतवाद्यांची टीप मिळाली होती. बारामुला येथील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे, सुरक्षा रक्षकांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवली. त्यामध्ये, बिलाल यांनी स्वइच्छेने सहभाग घेतला. या शोध मोहिमेदरम्यान संबधित घरातील सामान्य नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न बिलाल करत होते. त्यावेळी, दहशतवाद्यांना त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये, ते गंभीर जखमी झाले. शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहिल्यामुळे त्यांना वीरमरण प्राप्त झालं. दरम्यान, त्यांच्याय धाडसी कामगिरीबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.