नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मातृशक्ती महाकुंभच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या ठिकाणी पंतप्रधानांनी कार्यक्रमासाठी जमलेल्या महिलांना संबोधित केलं. यावेळी नवीन उत्तर प्रदेशला पुन्हा कधी अंधारात ढकलता येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. मात्र मोदींच्या या सभेनंतरचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
महिलांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप देखील केले आहेत. हा व्हिडीओ सर्वसामान्यांपासून ते काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नरेंद्र मोदींच्या बैठकीमधून परतणाऱ्या महिलांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यानंतर या महिलांनी मोदी सरकारविरोधातील आपला संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे समजणं गरजेचं आहे की त्यांच्या सभेमधून महिला नाराज होऊन बनारसला जात आहेत. महागाई वाढवून मोदींनी आम्हा सर्वांना निराश केलं आहे, असं देखील महिला सांगताना दिसत आहेत.
"जनतेच्या समस्याच ऐकून घ्यायच्या नव्हत्या तर आम्हाला वाराणसीहून का बोलावलं?"
पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघामधून आलेल्या एका महिलेने, आम्ही भाजपाला मत देणार नाही असं सांगितलं. आम्हाला तुम्ही वेडं समजलात काय?, असा प्रश्नही संतापून विचारला आहे. जर त्यांना जनतेच्या समस्याच ऐकून घ्यायच्या नव्हत्या तर त्यांनी आम्हाला वाराणसीहून का बोलावलं?, असा प्रश्न अन्य एका महिलेने विचारला आहे. गहू, तांदूळ, मीठ हे सर्व आता निवडणूक जिंकण्यासाठी दिलं जातं आहे. गरिबांसाठी ते काहीच करत नाहीत. यंदा आम्ही 100 टक्के त्यांना मत देणार नाही, असंही एका महिलेने म्हटलं आहे.
"टीका केल्याबद्दल योगीजी त्यांच्यावर खटला नक्की दाखल करतील"
माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडीओ शेअर करत मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदींच्या सभेला आलेल्या महिलाच त्यांच्यावर एवढी टीका करत आहेत. या महिलांचे चेहरे ब्लर करायला हवे होते. या महिलांना त्यांचा हक्क तर नाही मिळाला पण टीका केल्याबद्दल योगीजी त्यांच्यावर खटला नक्की दाखल करतील असं सूर्य प्रताप सिंह यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना, मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.