“पराभवातूनही शिकायला हवं”; PM मोदींचा भाजप पदाधिकाऱ्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 09:09 AM2021-06-07T09:09:54+5:302021-06-07T09:12:19+5:30
देशभरातील ५ राज्यांच्या झालेल्या निवडणुकांनंतर प्रथमच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली.
नवी दिल्ली: देशभरातील ५ राज्यांच्या झालेल्या निवडणुकांनंतर प्रथमच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये सर्व महासचिव उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी पराभवातूनही शिकायला हवे, असा सल्ला मोदींनी दिला. (in view of elections pm narendra modi told bjp leaders that learn from defeat too)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुमारे ५ तास ही बैठक झाली. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, पराभव असो वा विजय भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्याचा सविस्तर आढावा घ्यायला हवा. जेणेकरून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याप्रमाणे तयारी करणे शक्य होईल. २०१९ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली होती. मात्र, तरीही तृणमूल काँग्रेसने चांगले पुनरागमन केले आणि विजय मिळवला. मात्र, तरी पराभवातूनही शिकायला हवे, असे मोदी म्हणाले.
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग; बीएस येडियुरप्पा यांची सूचक प्रतिक्रिया
सेवा ही संघटन कार्यक्रमाचा आढावा
सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्याचा सल्लाही पंतप्रधान मोदींनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजप नेत्यांनी स्थानिक भाषांचा उत्तमपणे वापर आणि विस्तार करावा, असेही मोदींनी सांगितले. सर्व महासचिवांसोबत झालेल्या बैठकीत भाजपकडून सुरू करण्यात आलेल्या सेवा ही संघटन या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे समजते.
“योगी आदित्यनाथ हे मेहनती, प्रामाणिक; त्यांच्यासारखा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही”
दरम्यान, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना बुथ लेवल बैठकीत कार्यकर्त्यांनी घेरले आणि निषेध नोंदवला. तसेच कर्नाटकमध्येही मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना हटवण्याची मागणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पक्षाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्येही मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा होती. मात्र, आता योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली पुढील विधानसभा निवडणूक लढवली जाणार असल्याचे समजते.