विजय दर्डा यांची गुजरातचे मुख्यमंत्री रूपाणींसोबत चर्चा
By admin | Published: July 11, 2017 01:33 AM2017-07-11T01:33:36+5:302017-07-11T01:33:36+5:30
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची भेट घेऊन महाराष्ट्र आणि गुजरातच्या विकासाशी संबंधित अनेक मुद्यांवर चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गांधीनगर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी सोमवारी गांधीनगर येथे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची भेट घेऊन महाराष्ट्र आणि गुजरातच्या विकासाशी संबंधित अनेक मुद्यांवर चर्चा केली.
प्रस्तावित एक्स्प्रेस वेमुळे दोन्ही राज्यांसाठी विकासाचे नवे दालन खुले होणार असल्याने व्यापार आणि व्यवसायाच्या निर्माण होणाऱ्या संधींची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘विकास आणि समृद्धीसाठी महामार्ग’ या विषयावर एक परिषद आयोजित करण्याची इच्छा या भेटीत विजय दर्डा यांनी व्यक्त केली. या परिषदेमुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांना मोठा फायदा होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही या परिषदेसाठी निमंत्रित करता येईल, असे विजय दर्डा यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री रूपाणी यांनी या चर्चेदरम्यान गुजरातच्या विकासासाठी त्यांचे सरकार राबवीत असलेले उपक्रम आणि भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना लोककल्याणकारी कामांची माहिती देण्यासाठी आपले सरकार जोमाने तयारीला लागले आहे.’ या वेळी लोकमत मीडियाचे अध्यक्ष (सेल्स) करुण गेरा, उत्तर भारत प्रांताचे बिझनेस प्रमुख आशिष भाटिया व गुजरातमधील लोकमतच्या प्रतिनिधी उसमा मल उपस्थित होत्या. विजय दर्डा यांनी सोमवारी गांधीनगर येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारमण यांचीही भेट घेतली.
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी सोमवारी गांधीनगर येथे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची भेट घेतली त्यावेळचे छायाचित्र. सोबत लोकमत मीडियाचे अध्यक्ष (विक्री) करुण गेरा, उत्तर भारत प्रांताचे बिझनेस प्रमुख आशिष भाटिया आणि गुजरातमधील लोकमतच्या प्रतिनिधी उसमा मल.