नवी दिल्ली - भारताने एक पाऊल पुढे टाकलं तर पाकिस्तान दोन पावलं पुढे टाकण्यास तयार आहे, असे म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे सुतोवाच केले. पाकिस्तानातील करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इम्रान यांनी त्यांचे माजी क्रिकेटर मित्र नवज्योतसिंग सिद्धू यांचेही तोंडभरून कौतूक केले. सिद्धू यांनी पाकिस्तानात निवडणूक लढवली तरी, ते विजयी होतील, असे खान यांनी म्हटले.
पाकिस्तानमधील करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजन कार्यक्रमात काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांनी इम्रान खान यांचे भरभरुन कौतूक केले. तसेच आता गोळीबारी नकोय, प्रेम अन् शांती हवीय. त्यासाठी आपण सर्वांनीच आपले विचार बदलायला हवेत, असे सिद्धू यांनी म्हटले. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांचे तोंडभरुन कौतूक केले. सिद्धू हे पाकिस्तानला शांतीचा संदेश घेऊन आले होते. मग, त्यांच्यावर टीका कशासाठी ? सिद्धू हे पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. जर, त्यांनी पाकिस्तानमधून निवडणूक लढवली, तरीही ते विजयी होतील, असे सिद्धू यांचे क्रिकेटर मित्र आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले.