नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले ‘चांद्रयान-2’ मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ‘चांद्रयान-2’ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. आज (2 सप्टेंबर) चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' वेगळं झालं आहे. याआधी मंगळवारी (20 ऑगस्ट) चांद्रयान -2 यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्याची माहिती इस्रोने ट्विट करून दिली होती. ‘चांद्रयान-2’ ने प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
सोमवारी दुपारी 12 वाजून 45 मिनिटे ते एक वाजून 45 मिनिटे या कालावधीत 'विक्रम' लँडर मुख्य यानापासून वेगळं केलं जाणार होतं. त्यानुसार चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' वेगळं झालं आणि चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘चांद्रयान-2’ यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर इस्रोच्या प्रमुखांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी आतापर्यंतच्या मोहिमेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मोहिमेतील पुढील टप्प्यांविषयी माहिती दिली. ''या मोहिमेतील पुढील महत्त्वाचा टप्पा 2 सप्टेंबर रोजी येईल. त्यादिवशी लँडर विक्रम हा ऑर्बिटरपासून वेगळा होईल. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी आम्ही काही सेकंदांसाठी इंजिनाची चाचणी घेऊन लँडरमधील प्रणाली व्यवस्थित चालू आहे की नाही याची चाचपणी करणात आहोत.'', असे सिवन यांनी सांगितले होते. त्यानुसार आज ऑर्बिटरपासून 'विक्रम' लँडर वेगळं झालं आहे.
7 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी विक्रम हा चंद्राच्या पृष्टभागावर लँड करणार आहे. 7 सप्टेंबर रोजी ‘चांद्रयान-2’ दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. ‘चांद्रयान-2’ कडून देशवासीयांना हा सुखद संदेश देण्यात आला आहे. इस्रोने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. 'नमस्कार, मी ‘चांद्रयान-2’. माझा आतापर्यंतचा प्रवास विलक्षण झाला. 7 सप्टेंबर रोजी मी दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मी कुठे आहे आणि काय करत आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या संपर्कात राहा' असं ट्वीट इस्रोने याआधी केलं आहे.
पुढचा प्रवास कठीण होत जाणार
22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या ‘चांद्रयान-2’ने 14 ऑगस्ट रोजी पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने प्रयाण केले होते. आता पुढचे काही दिवस ‘चांद्रयान-2’ चंद्राभोवती घिरट्या घालणार आहे. या काळामध्ये इस्रोकडून ‘चांद्रयानच्या कक्षेत पाचवेळा बदल करण्यात येणार आहेत. त्यानंतर अखेरीस हे यान चंद्राच्या ध्रुवावरून जात चंद्रावरील 100 किमी अंतरावरील आपल्या शेवटच्या कक्षेत पोहोचेल.
पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर हे 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे. चांद्रयान-2 द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी 4 दिवसाआधी रोव्हर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर 6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. 15 मिनिटांच्या आतमध्ये इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.
चंद्रावर पोहोचण्यासाठी यानाला 40 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. चंद्रावर उतरण्यापूर्वीची 15 मिनिटं यानासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असणार आहेत. के. सिवन यांनी लँडिंगच्या वेळची शेवटची 15 मिनिटं ही अधिक आव्हानात्मक असणार आहेत असं म्हटलं आहे. तसेच याआधी के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चंद्रापासून 30 किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान-2 ची गती कमी करण्यात येणार आहे. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. याच दरम्यानची 15 मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. केवळ इस्रोसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठीच ही 15 मिनिटं आव्हानात्मक असतील.' सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत यशस्वी झाल्यास असे करणारा तो जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यामध्ये यशस्वी झाला आहे.