नवी दिल्ली : लहानपणी तुम्ही एखाद्या खोल नदीत सोने-चांदी सापडत असल्याच्या गोष्टी ऐकल्या असतील. मात्र, अशी घटना प्रत्यक्षात घडली तर आश्चर्य वाटायला नको. कारण, सध्या मध्य प्रदेशातील एक नदीत सोन्या-चांदीची नाणी सापडत असल्याची चर्चा आहे.
मध्य प्रदेशातील शिवपुरा परिसरात काही मच्छीमारांना एका नदीत काही नाणी मिळाली. ही बातमी पंचक्रोशीत पसरली. त्यानंतर आजू-बाजूचे गावकरी याठिकाणी जमले आणि हा सोन्या-चांदीचा खजिना शोधू लागले.
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्याची ही घटना आहे. याठिकाणी शिवपुरा व गुरुदपुरा गावातील लोक पर्वती नदीत खोदकाम करीत आहेत. या नदीत हे लोक सोन्या-चांदीची नाणी शोधत आहेत. जवळपास एक आठवड्यापासून हे गावकरी या खजिन्याच्या शोधात आहेत.
एका स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार, आठ दिवसांपूर्वी काही मच्छीमारांना येथे नाणी सापडली. त्यानंतर याबाबतची माहिती सर्वांना कळल्यानंतर हे सर्व लोक इकडे येऊ लागले. आता बरेच लोक येथे खोदत आहेत आणि सोन्या-चांदीची नाणी शोधत आहेत.
दरम्यान, या नदीकाठावर सोन्या-चांदीची नाणी शोधण्यासाठी लहान मुलांसह पुरुष आणि महिलांचाही मोठा सहभाग आहे. याप्रकरणी प्रशासनही सतर्क असून लोकांवर लक्ष ठेवून आहे.