आसामच्या नागाव येथील काही संतप्त गावकऱ्यांनी एका पोलीस ठाण्यालाच आग लावली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षा घेत, दुसऱ्या दिवशी प्रशासनाने कठोर कारवाई करत येथील अनेक घरांवरून बुलडोझर फिरवला. सलोनाबोरी गावातील जवळपास 40 जणांनी बाताद्रवा पोलीस ठाण्याला आग लावली होती. एका व्यक्तीचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाला, असा आरोप या गावकऱ्यांनी केला होता.
यासंदर्भात, नागाव जिल्हा प्रशासनाने मृताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निलंबितही करण्यात आले आहे. याच बरोबर, रविवारी सकाळच्या सुमारास, पोलीस ठाण्याला आग लावण्याच्या घटनेत सहभागी असलेल्यांच्या घरावरून बुलडोझर फिरविण्यात आला आहे.
यासंदर्भात आसामचे स्पेशल डीजीपी जीपी सिंह म्हणाले, जमावात एकूण ४० लोक होते. यांपैकी सात जणांची ओळख पटली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, इतर 21 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याच बरोबर, कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणातही पोलिसांविरोधात कठोर करवाई करण्यात येईल. मात्र, अशा आरोपांनंतर, आपण पोलीस ठाण्यालाच आग लावावी, हे बिलकूल योग्य नाही. आरोपींची ओळख पटविण्यासाटी व्हिडिओ फुटेज पाहण्यात येत आहे, असेही जीपी सिंह यांनी म्हटले आहे.
घरांवर बुलडोझर चालविल्याच्या घटनेनंतर, बारपेटाचे काँग्रेस खासदार अब्दुल खलीक यांनी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. "मी पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याचे कधीही समर्थ नकरत नही. पण, पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांची घरे तोडणे, हे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे," असे खलीक यांनी म्हटले आहे.