मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ४ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 11:01 PM2024-01-01T23:01:23+5:302024-01-01T23:02:18+5:30
मणिपूर पोलिसांकडून या हल्ल्यात ४ जण मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे
मणिपूर - गेल्या वर्षभरापासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये अद्याप शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही. मणिपूरमधील मोरेह येथे पोलीस आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक झाली होती. उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांवर दबा धरून हल्ला केला. रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडद्वारे करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये चार पोलीस कमांडो जखमी झाले होते. त्यानंतर, थौबल आणि इम्फाळ वेस्ट जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी थौबल जिल्ह्यातील लिलोंग परिसरात अज्ञात शस्त्रधारी गुंड आणि स्थानिकांमध्ये झटापट झाली. या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मणिपूर पोलिसांकडून या हल्ल्यात ४ जण मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. शस्त्रधारी गुंडांनी स्थानिकांवर हल्ला केला, यावेळी गोळीबारही करण्यात आला. त्यामध्ये, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातही संचारबंदी लावण्यात आली आहे. आता, मणिपूरच्या इम्फाळ घाटीत पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर विष्णुपूर जिल्ह्यातील संचारबंदीत देण्यात आलेली सवलत बंद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एन. बीरेन यांनी एका व्हिडिओ संदेशातून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. संबंधित घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, तसेच सरकारला सहकार्य करावे, असे बीरेन यांनी म्हटले आहे. लिलोंगच्या नागरिकांनी हिंसात्मक पाऊल उचलू नये, पोलीस आरोपींचा शोध घेत असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन दिवसांपूर्वीच झाली झटापट
मणिपूरमध्ये ३० डिसेंबर रोजीही उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य केले होते. त्यामध्ये, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायांना दुखापत झाली होती. रात्री सुमारे ११.४० च्या सुमारास संदिग्ध कुकी उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांवर आरपीजीद्वारे हल्ला केला. त्यानंतर उग्रवाद्यांनी मेरेह येथे तैनात असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरदाखल कारवाईमध्ये पोलिसांनीही गोळीबार केला. दोन्हीकडून रात्रभर गोळीबार सुरू होती, असे सांगण्यात येत आहे.