दिल्लीतील हिंसाचार हा मोदी सरकारचाच डाव, आमदाराने दिला राजीनामा
By महेश गलांडे | Published: January 27, 2021 06:30 PM2021-01-27T18:30:04+5:302021-01-27T18:30:56+5:30
दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आमदार अभय चौटाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. चंढीगड विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. त्यातूनच,आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून येतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्लीतील हिंसाचारामागे भारतीय जनता पक्षाचा (भाजप) हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर, आता काँग्रेसनेही दिल्लीतील आंदोलनाची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांचीच असल्याचं म्हटलंय. तर, दिल्लीतील हिंसाचाराच्या समर्थनार्थ आमदार अभय चौटाला यांनी राजीनामा दिलाय.
दिल्लीतील हिसांचारामागे केंद्रातील मोदी सरकारच असल्याचा आरोप इंडियन नॅशनल लोक दलाचे आमदार अभय चौटाला यांनी केलाय. तसेच, दिल्लीतील आंदोलनावरुन शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात येत असल्याचा विरोधात आणि दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आमदार अभय चौटाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. चंढीगड विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.
जो किसान नेता आंदोलन की अगुवाई कर रहे थे उनके खिलाफ केंद्र सरकार ने मुकदमे दर्ज़ किए। कल दिल्ली में जो हुआ वह केंद्र सरकार की साजिश थी: अभय चौटाला, INLD, इस्तीफा देने के बाद https://t.co/o079A9c6xopic.twitter.com/aL5WTWC9JW
— ANI_HindiNews (@AHindinews) January 27, 2021
त्यांनी त्यावेळी म्हटलं होत, मला खुर्ची नको माझ्या देशाचा शेतकरी आनंदी झाला पाहिजे. त्यामुळेच, शेतकरी आणि माझ्या मतदारसंघातील जनतेसमोर सही करुन मी माझा राजीनामा सोपवत आहे. देशातील प्रत्येक शेतकरी पुत्राने राजकारणापलिकडे जाऊन शेतकऱ्यांची साथ दिली पाहिजे, असे ट्विट चौटाला यांनी केलंय. अभय चौटाला हे हरयाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पार्टीचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांचे काका आहेत.
काँग्रेसची मागणी
अमित शहा यांच्या आदेशावरुनच दिल्ली पोलिसांकडून शेतकरी आंदोलनातील शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करत आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृतीतून भाजपा सरकारचाच हा डाव असल्याचे सिद्ध होते. गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयश आलंय. त्यामुळे, मोदी सरकारने अमित शहांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केलीय. शेतकरी आंदोलनाच्या आड करण्यात आलेल्या हिंसारासाठी सरळ-सरळ गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत. अमित शहा यांना एक क्षणही आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तात्काळ बरखास्त करण्यात यावं, अशीही मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय.
काही शेतकरी नेत्यांची माघार
प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. एकीकडे पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी कृषी आंदोलनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय किसान युनियन (भानू) ठाकूर भानू प्रताप सिंह यांनीही शेतकरी आंदोलनातून माघार घेतली. आंदोलनातून माघार घेणाऱ्या दोन्ही संघटना ह्या उत्तर प्रदेशमधील आहेत.
राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांचा आरोप
लाल किल्ल्याच्या दिशेने ट्रॅक्टर रॅली गेली. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला. भाजपशी संबंधित दीप सिद्धूने तिथे ध्वज फडकवण्याचे काम केले. याच दीप सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दिल्लीत उसळलेला हिंसाचार हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना केला.
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
दिल्लीतील हिंसाचाराबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली झालेल्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. हिंसाचार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याशिवाय, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील एक प्रकारे समर्थन करत आहेत, असा आरोप सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
शेतकरी नेत्यांचा आरोप
शेतकरी नेते आणि स्वराज अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव, भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनी अभिनेता दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. मात्र, दीप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारात तब्बल ३०० पोलीस जखमी झाले असून, या प्रकरणी २०० जणांना अटक करण्यात आली आहे.