व्हायरल! केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 07:15 PM2018-12-10T19:15:42+5:302018-12-10T19:16:26+5:30
चेहऱ्यावर पांढरा रंग अन् संपूर्ण शरीर काळ्या रंगाचे असलेली ही गाय एकदम 'क्युट' दिसत आहे.
नवी दिल्ली - जगातील सर्वात लहान गायीचे वजन 4.5 किलोग्रॅम भरले आहे. या गायीला पाहून वैद्यकीय पथकही हैराण झाले आहे. कारण, या गायीचे वजन कमी असूनही ही गाय शारिरीकदृष्ट्या स्वास्थ असल्याचे वैद्यकीय पथकाने म्हटले आहे. जगातील ही सर्वात लहान गाय नेटीझन्ससाठी आश्चर्य बनले असून फेसबुकवर #LilBill या हॅशटॅगने या गायीचे फोटो शेअर करण्यात येत आहेत. चेहऱ्यावर पांढरा रंग अन् संपूर्ण शरीर काळ्या रंगाचे असलेली ही गाय एकदम 'क्युट' दिसत आहे.
अमेरिकेतील मिसीसिपी येथे ही सर्वात लहान गाय आढळून आली आहे. विशेष म्हणजे एका मांजरीएवढे या गायीचे वजन असल्याने ही गाय चर्चेचा विषय बनली आहे. सध्या ही गाय मिसीसिपी स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ व्हेटर्नरी येथे ठेवण्यात आली आहे. गायीचे वजन पाहून त्या गायीचे मालक चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी गायीला संबंधित जनावरांच्या दवाखान्यात नेले. पण, तेथून या गायीला वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी नेण्यात आले. गायीच्या तपासणीनंतर ही गाय शारिरीकदृष्ट्या फीट आणि तंदुरूस्त असून केवळ वजन कमी असल्याचे तेथील पथकाने स्पष्ट केलं.
अमेरिकेतील जनावरांच्या तज्ञ डॉक्टरांनी जेव्हा या गायीला जगासमोर आणले, तेव्हा नेटीझन्सकडून या गायीला गोंजारण्यात येऊ लागले. म्हणजेच, या छोट्याशा गो-माताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात येऊ लागले. तर, आमच्यासाठी ही अत्यंत दुर्मिळ केस असून या गायीचे वजन पाहून आम्हीही हैराण झालो होतो, असे वैद्यकीय पथकाने म्हटले आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण गायींपेक्षा या गायीचे वजन दहापट कमी आहे.
फेसबुकवर या गायीचा पहिला फोटो येताच, नेटीझन्सकडून या गायीचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला आहे. काही वेळांतच #LilBill हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी आप-आपल्या क्रिएटीव्ह कॅप्शनसह या लहान गायीचे फोटो शेअर केले आहेत. तर, अनेकांनी लव्ह, क्यूट असे स्माईली देत या गायीसोबत आपले प्रेम व्यक्त केले आहे. लोकांकडून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्रतिसादामुळे या गायीवर निगराणी ठेवणाऱ्या वैद्यकीय पथकानेही गायीचे अपटेड क्षणाक्षणाला देणार असल्याचे नेटीझन्सला सोशल मीडियातूनच सांगितले आहे. दरम्यान, यापूर्वी तीन पायांची गाय, पाच पायांची गाय किंवा दोन मुखी गाय असे गायीचे प्रकार पाहण्यात आले आहेत. मात्र, केवळ 10 पाऊंड म्हणजेच 4.5 किलो ग्रॅम वजनाची गाय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.